खानापूरजवळ स्कूल बस-अ‍ॅपे रीक्षात अपघात : तीन वर्षीय बालिका ठार

रावेर : रावेर- बर्‍हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर स्कूल बस व अ‍ॅपे रीक्षात अपघात होवून तीन वर्षीय बालिका ठार झाली तर 30 वर्षीय युवक जखमी झाला आहे. हा अपघात गुरुवारी दुपारी तीन वाजता घडला. या अपघातात महेक सायबू तडवी (3) या बालिकेचा मृत्यू झाला.

पत्नीची भेट ठरली अखेरची
पातोंडा (मध्यप्रदेश) येथून सासरवाडीला पत्नीची भेट घेऊन सायबू बाबु तडवी (30, अभोडा) हा तीन वर्षीय मुलगी महेकसह अ‍ॅपेने रावेरच्या दिशेने येत असताना रावेरकडून बर्‍हाणपूरकडे जाणारी बर्‍हाणपूरच्या मॅक्रो व्हिजन स्कूलची बसमध्ये अपघात घडला. खानापूरजवळील नवीन चेक पोस्टनजीक ही घटना घडली. या अपघातात महेक तडवी ही ठार झाली तर तिचे वडील व रीक्षा चालक सायबू तडवी गंभीर जखमी झाले. त्यांना अंबिका व्यायाम शाळेच्या रुग्ण वाहिकेद्वारे रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातानंतर अनेकांची धाव
स्कूल बस व रीक्षा अपघाताची माहिती कळताच राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमुद शेख, पंचायत समिती सदस्य पी.के.महाजन यांच्यासह नागरीकांनी ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली. अत्यंत प्रतिकुल परीस्थितीत उदरनिर्वाह करणार्‍या परीवारावर अपघाताच्या माध्यमातून संकट कोसळले असून शासनाने मदत देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.