खानापूरातील जुगार धाड; 74 आरोपींची जामिनावर सुटका

0

स्वतंत्र दोन गुन्हे दाखल; 12 लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त

रावेर– तालुक्यातील खानापूरपासून जवळच असलेल्या एका शेतात खुलेआमपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर भुसावळचे सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल व त्यांच्या पथकाने सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास अत्यंत गुप्त पद्धत्तीने धाड टाकत 74 जुगारींच्या मुसक्या आवळल्या होत्या. आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दरम्यान, जुगाराचा अड्डा चालवणारा शैलेश ठाकूर (बर्‍हाणपूर) व शेख आसीफ उर्फ गुड्डू शेख कल्लू (खानापूर) हे पसार असून त्यांचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे.

इतिहासातील सर्वाधिक मोठी धाड
खानापूर येथे सोमवारी पोलिसांनी टाकलेली आतापर्यंत सर्वाधिक मोठी धाड असल्याचे मानले जात आहे. भुसावळच्या अधिकार्‍यांनी रावेर तालुक्यात येऊन कारवाई केल्याने स्थानिक पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. खानापूर गावापासून काही अंतरावर असलेल्या दोन वेगवेगळ्या शेतात पोलिसांनी धाड टाकत दोन लाख 82 हजार 85 रुपयांची रोकड, आठ लाख 18 हजार रुपये किंमतीच्या 29 दुचाकी तर 92 हजार 900 रुपये किंमतीचे 47 मोबाईल जप्त केले होते.