रावेर : तालुक्यातील खानापूर येथील शेतमजुराने गरीबीला कंटाळून व ओला दुष्काळाने हाताला काम नसल्याने गळफास घेवुन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना बुधवार, 20 रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास घडली. कैलास देवराम पाटील (48) असे मृत मजुराचे नाव आहे.
हायमास्टला दोरी बांधत आवळला गळफास
गरीबी तसेच दुष्काळी परीस्थितीमुळे हाताला काम मिळत नसल्याने बुधवार, 20 रोजी रात्री 11 ते 12 वाजेच्या सुमारास खानापूर येथील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कानीफनाथ महराज देवस्थानच्या समोर असलेल्या व खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या हायमास्ट लाईटाच्या खांबाला रेशमाच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेत कैलास पाटील यांनी आत्महत्या केली. घटनास्थळाजवळून रात्री सोहेल शे.शकील हे आपला हॉटेलचा व्यवसाय आटोपून घरी येत असताना त्यांच्या लक्षात ही घटना आली. त्यांनी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य वैभव धांडे यांना फोन करून सदर घटनेची माहिती दिली. त्यानंतर वैभव धांडे यांनी दरवाजा उघडून सदर बाबीची चौकशी करून मयताजवळ जावुन ओळख पटवली तसेच दत्त मंदिर संस्थानचे अध्यक्ष भास्कर पाटील यांना रात्री 12 वाजेच्या सुमारास कैलास पाटील याने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची माहिती दिली. चोरवड पोलिस पाटील दीपक महाजन यांना घटना कळताच त्यांच्यासह संजय महाजन यांनी रात्री रावेर पोलिस ठाण्यात माहिती दिली. रात्री दोन वाजता कॉन्स्टेबल निलेश चौधरी, गफूर शेख यांच्यासह पोलिस कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. 21 रोजी सकाळी रावेर ग्रामीण रुग्णालयात डॉ.महाजन व पाटील यांनी शवविच्छेदन केले. खानापुर येथे गुरुवारी सकाळी 11 वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृताच्या पश्चात पत्नी, मुलगा ,एक विवाहीत मुलगी असा परीवार आहे. मयत कैलास पाटील यांच्या कुटुबंबाला शासकीय मदत मिळावी अशी, मागणी परीसरातुन होत आहे.कैलास हे सामाजिक कार्यकर्ते समाधान मोतीराम पाटील यांचे चुलत भाऊ तर विलास देवराम पाटील यांचे लहान भाऊ व कृष्णा पाटील यांचे वडील होत. रावेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सुनील कदम व कॉन्स्टेबल निलेश चौधरी करीत आहे.