रावेर- रावेर-बर्हाणपूर महामार्गावरील खानापूर येथील उड्डाणपूलाजवळील गो शाळेसमोर माल ट्रक व मोटरसायकल यांची समोरासमोर जोरदार धडक होऊन मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी तीन वाजता घडली. या घटनेनंतर ट्रक चालक पसार झाला. रावेर-बर्हाणपूर महामार्गावरील खानापूर येथील उड्डाणपूलाजवळ गो शाळेसमोर दुचाकी (क्रमांक एम.पी.19 एम.एच. 8300) व निंबुने भरलेला माल ट्रक यांची सोमवारी दुपारी तीन वाजता जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार चमारसिंग सरदार सिंग (34, रा.धुलकोट बोरी, मध्यप्रदेश) हा गंभीर जखमी झाला तर त्याचा साथीदार कलसिंग हजार्या पावरा (40, रा.धुलकोट बोरी) यास किरकोळ दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच रावेर पोलिस ठाण्याचे हवालदार श्रीराम वानखेडे, विकास तायडे, हरीलाल पाटील, निलेश चौधरी, चालक योगेश चौधरी यांनी जखमी 108 रुग्णवाहिकेतून रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर पद्मलोचनदास स्वामी, गोलू धनगर, विश्वंबर पाटील, कुंदन चौधरी, उमाकांत मराठे, महेंद्र पाटील व नागरीकांनी धाव घेत जखमींना उपचारास हलवण्याकामी सहकार्य केले.