जळगाव (डॉ.युवराज परदेशी) – पुणे व मुंबईमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना कोरोनामुक्त भाग म्हणून राज्यभर कौतूक झालेल्या खान्देशला देखील कोरोनाचा विळखा दिवसेेंदिवस घट्ट होत चालला आहे. सर्वप्रथम जळगावच्या शहरी भागात धडक दिल्यानंतर नंदुरबार व धुळे येथील आदिवासी भागाला कोरोनाने डंख मारला आता तर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मुंगसे या ग्रामीण भागातही कोरोना हातपाय पसरत असल्याने खान्देशवासियांची चिंता वाढली आहे.
जळगाव जिल्ह्यात बुधवारी करोनाचा सहावा रुग्ण आढळला. अमळनेर येथील एका ७३ वर्षीय वृद्धाचा करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या वृद्धाला २० एप्रिलला जिल्हा रुग्णालयात करोना संशयित म्हणून दाखल केले होते. मात्र, त्याच दिवशी वृद्धाचा मृत्यू झाला होता. या वृध्दाच्या मृत्यूनंतर त्यांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात करोना बळींची संख्या ३ झाली आहे. धुळ्यात गुरुवारी सात नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. सात पैकी सहा रुग्ण धुळे शहरातील तर एक रुग्ण शिरपूरमधील आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ८ वरून १५ वर गेली आहे. एकट्या धुळे शहरात १२ रुग्ण, शिंदखेडा १, साक्री १, शिरपूर १ असे एकूण १५ रुग्ण आहेत. नंदुरबार जिल्ह्यातही कोरोनाबाधितांची संख्या ७ वर पोहचली आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात खान्देशातील तिनही जिल्हे कोरोनापासून लांब होते. जळगाव जिल्ह्यात मार्च अखेरीस दोन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यानंतरचे १८ दिवस एकही नवा रुग्ण न आढळल्याने जळगाव ऑरेेंज झोनमध्ये तर धुळे व नंदुरबार हेे ग्रीन झोनधध्ये होते. मात्र २१ दिवसांच्या लॉकडाऊनंतरही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळतात हा चिंतेचा विषय आहे. जळगाव, धुळे व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यातील रुग्णांचे कनेक्शन हे मालेगाव व मुंबईशी आढळून येत आहे. लॉकडाऊननंतर वाढलेल्या या संख्येेंमुळे जिल्हाबंदी खरंच आहे का? असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. अनेक ठिकाणी लपूनछपून प्रवास केला जात आहे. आता तर लॉकडाऊन थोडासा शिथिल करण्यात आल्यानंतर किराणा, दुध, भाजीपाला, औषधी घेण्याच्या नावाखाली रस्त्यांवर गर्दी वाढू लागली आहे. व्यापारी मालवाहू गाड्या घेऊन कॉलनी आणि छोट्या गावांमध्ये जाऊन गर्दी गोळा करीत आहेत. बाजारात कुठलेही सोशल डिस्टन्सिंगचे पालन होतांना दिसत नाही. लॉकडाउनच्या अंमलबजावणीत जिल्हा प्रशासन व पोलिस यंत्रणा कुठेतरी कमी पडतांना दिसत आहे. शेतीमालाची बाजारपेठेत विक्री करताना शिस्तीचे कठोर पालन, स्वस्त धान्य दुकानातील सुरक्षित वितरण व्यवस्था, जिल्हाबंदीची काटेकोरपणे अमंलबजावणी, विनाकारण फिरणार्यांना पोलिसांच्या खास स्टाईलने ‘फ्री बॉडी मसाज’ देण्यासह कठोर पावले उचलणे गरजेची आहेत. मात्र यात पूर्णपणे प्रशासन व पोेलीस दोषी आहेत असे नाही, या करीता प्रत्येकाने हिरोगिरी न करता आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. नागरिक शहाणे (दीड शहाणे नव्हे)आणि प्रशासन व पोलिस यंत्रणा सतर्क होणार नसेल, तर संपूर्ण खान्देश ‘रेड झोन’ होण्यास वेळ लागणार नाही.