प्रशासनाने घेतला आढावा ; प्रवाशांसाठी 50 बसेसची व्यवस्था
यावल- खान्देशवासीयांचे कुलदैवत, तातपुडा निवासिनी मनुदेवीच्या नवरात्रोत्सवाला बुधवारपासून सुरूवात होत असल्याने भाविकांच्या सुरक्षेसह सोयी-सुविधांचा आढावा बैठक मंगळवारी तहसीलदार कुंदन हिरे यांनी घेतला. मंदिर सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले. विविध शासकीय यंत्रणेसह मंदिर समिती विश्वस्थ बैठकीस उपस्थित होते.
लाखो भाविक लावणार हजेरी
खान्देशवासीयांचे कुलदैवत असलेल्या तालुक्यातील आडगाव येथील सातपुडा निवासिनी श्री मनुदेविच्या दर्शनार्थ नवरात्री उत्सवात दररोज लाखो भाविक हजेरी लावतात. मांढरादेवि अपघाताची पुनरावृत्ती होवू नये म्हणून शासनाचे आदेशान्वये तहसीलदार कुंदन हिरे यांनी मंगळवारी भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर व्यवस्थपनाने व विविध शासकीय विभागाकडून केलेल्या व्यवस्थेचा आढावा बैठकीत घेतला. या प्रसंगी मंदिर समितीकडून भाविकांच्या दर्शनाची केलेली व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच स्वच्छता व सुरक्षात्मक व्यवस्थेची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष शांताराम पाटील व सचिव नीळकंठ चौधरी यांनी दिली. यावल एस.टी.आगाराचे आगारप्रमुख यांनी भाविकांसाठी दररोज 50 बसेसची व्यवस्था केल्याचे सांगून मंदिराच्या अलिकडे आठ किलोमीटर अंतरावर मानापुरी येथे तात्पुरते बसस्थानकासह खाजगी वाहनासाठी तळ उभारत असल्याचे सांगून भाविकांना मंदिरापर्यंत एस.टी.बसेसनेच प्रवास करावा लागणार असल्याचे सांगितले. त्यासाठी 50 बसेसची व्यवस्था केल्ी असल्याचे सांगितले. पोलिस निरीक्षक डी. के. परदेशी यांनी बसस्थानकापासून तर मंदिरापर्यंत पुरेसा पोलिस बंदोबस्त राहणार असल्याचे सांगितले. भाविकांना आडगाव-कासारखेडा गावातून जावे लागत असल्याने मंदिराकडे येणार्या रस्त्यावर स्व्च्छता ठेवण्याचे आदेश तहसीलदार यांनी संबधित ग्रामपंचायतींना दिले आहेत. यासह सार्वजनिक बांधकाम विभागास मंदिरापर्यंतच्या रस्त्याची डागडूजी करून विशेषत: नदीपात्रातील रस्त्याची काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत. प्रसंगी तहसीलदार हिरे , पोलिस निरीक्षक परदेशी यांनी मंदिर आवाराची पाहणी करून विक्रेता संघासही आवश्यक सूचना केल्या.
यांची होती उपस्थिती
बैठकीस पोलिस निरीक्षक डी.के.परदेशी, आगारप्रमुख एस.व्ही.भालेराव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सी.डी.तायडे, आडगाव सरपंचा मंगला कोळी, महाहंसजी महाराज यांच्यासह संबधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, लाखो भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न असतांना बैठकीस गटविकास अधिकारी व वनविभागाचे कोणतेही अधिकारी उपस्थित न राहिल्याने तहसीलदार कुंदन हिरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबधिताची नावे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवणार असल्याचे सांगितले.