खान्देशच्या मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पाहणार्यांकडुन कलावंताकडे दुर्लक्ष
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा एकनाथराव खडसेंवर पलटवार
जळगाव – पालकमंत्री म्हणुन माझ्या कार्यकाळात जी कामे मी करीत आहे, ती स्वातंत्र्याच्या इतिहासात कुणीही केली नाही. बरेच लोक वेगवेगळे बोलतात. खान्देशच्या मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने उराशी बाळगणार्यांची खान्देशच्या कलावंतांकडे पाहण्याची हिम्मत देखील झाली नसल्याचा पलटवार ना. गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर केला.
जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि शिवसेनेचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काल नशिराबाद येथे एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्रीपदी डावलल्याने खान्देशवर अन्याय झाल्याचे विधान केले होते. या विधानाचीच रि ओढत शिवसेनेचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी खडसेंवर जोरदार पलटवार केला. खान्देश लोककलावंत विकास प्रतिष्ठानतर्फे आयोजीत वहिगायन लोककला संमेलनात मार्गदर्शन करतांना ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, खान्देशातील कलावंतांसाठी आजपर्यंत कुणीही काहीही केले नाही. मात्र या कलावंतांना राजप्रतिष्ठा मिळवुन दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा शब्द दिला. तसेच विखुरलेल्या शक्तीला कुणीही मान देत नाही. संघटीत झालेल्याला लोक घाबरतात. त्यामुळे आमची कामे जो करणार नाही त्याचा डफ वाजविण्याची ताकद आमच्यात असल्याचेही ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले.