खान्देशातील केळी उत्पादकांना कृषी मंत्र्यांचे मदतीचे आश्‍वासन

0

‘निपाह’च्या संशयाने पडून असलेल्या केळीची होणार तपासणी ; मंत्री खडसेंसह शिष्टमंडळाची कृषी मंत्र्यांची भेट

भुसावळ- निपाह विषाणूच्या संशयामुळे उत्तर भारतात पडून असलेल्या केळीची तपासणी होणार असून अहवालानंतर केळीवर निपाह नसल्यास त्याबाबत सरकारकडून संदेश प्रसारीत केला जाण्याची ग्वाही देत खान्देशातील केळी उत्पादकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठ सरकारकडून सर्वोतोपरी मदतीचेी ग्वाही केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी शिष्टमंडळाला दिली. गुरुवारी सकाळी 11 वाजता नवी दिल्ली येथिल कृषी मंत्रालयात सिंग यांची माजी महसूल व कृषी मंत्री एकनाथरावजी खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार हरीभाऊ जावळे, जिल्हा परीषदेचे नंदकिशोर महाजन यांच्या समवेत शिष्टमंडळाने भेट घेतली.

शिष्टमंडळाने शेतकर्‍यांच्या मांडल्या व्यथा
निपाह रोगाचे विषाणू केळीवर असल्याच्या अफवेमुळे उत्तर भारतात केळी खरेदी करण्यासाठी व्यापारी धजावत नाही त्यामुळे गेल्या 10 ते 12 दिवसापासून तेथील बाजारपेठेत सुमारे एक हजार टन केळी पडून असल्याने केळी उत्पादक शेतकरी, व्यापारी, माल वाहतूकदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. ही बाब मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. जळगाव आणि बुलढाणा परीसरातील केळीवर कोणत्याही प्रकारची लागण नसून, उत्तर भारतातील पडून असलेल्या केळीमधील नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवावेत, खान्देशातील केळीवर निपाह रोगाचे विषाणू असल्याची अफवा पसरवणार्‍यांवर कडक कारवाई करावी तसेच खान्देशातील 1500 ते 1600 हेक्टर जमिनीवरील केळी पिकाचे नुकसान चक्रीवादळाने झाल्योन सरकारने मदत जाहीर करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

केळी विमा कंपनीसोबत बैठक घेतली जाणार
केळी उत्पादकांचे झालेले नुकसान पाहता ज्या शेतकर्‍यांनी पीक विमा संरक्षण घेतले आहे अशा शेतकर्‍यांसाठी राज्य सरकार आणि विमा कंपन्यांचे अधिकारी यांची तातडीची बैठक घेऊन लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करतील. ज्या शेतकर्‍यांनी पीक विमा संरक्षण घेतलेले नाही अशा शेतकर्‍यांसाठी राज्य सरकारकडून अहवाल मागवण्यात आला असून त्यांनाही मदतीचा हात देण्याबाबत मंत्र्यांनी आश्‍वासन दिले.

यांचा शिष्टमंडळात समावेश
शिष्टमंडळात माजी शिक्षण व आरोग्य सभापती सुरेश धनके, रावेर तालुकाध्यक्ष सुनील लक्ष्मण पाटील, पंचायत समिती सदस्य विकास पाटील, गोपाळ लक्ष्मण नेमाडे, प्रल्हाद पंडित पाटील, महेश नारायण पाटील, रमेश कडू पाटील, किशोर रामू महाजन, काशीनाथ मोतीराम धनगर, रामदास त्र्यंबक पाटील या शेतकर्‍यांचा समावेश होता.