खान्देशातील सात महिलांचा बहिणाबाई पुरस्काराने गौरव

0

भुसावळ- विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करणार्‍या सात महिलांना बहिणाबाई पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. पुरस्कारार्थींमध्ये साहित्यीक तथा खान्देशातील प्रति बहिणाबाई असलेल्या प्रा.कमल अरुण पाटील, स्वयंदीप संस्थेच्या माध्यमातून दिव्यांगांना रोजगार देणार्‍या चाळीसगावच्या मीनाक्षी निकम, समुपदेशनाने अनेकांच्या संसाराची घड बसवणार्‍या जळगाव महिला बालकल्याण कक्षाच्या समुपदेशक शोभा यशवंत हंडोरे, धर्नुविद्येतील प्रावीण्य मिळवणार्‍या सायुरी युवराज महाजन, मुंबईच्या यामिनी वनराज लोहार, परीचारीका शोभा माधवराव पाटील व मनुमाता भरीत सेंटरच्या संचालिका शैला गणेश वाघुळदे यांचा समावेश आहे.

गुलाबरावांनी घेतले नाथाभाऊंचे आशीर्वाद
भाजपा-शिवसेनेतील सख्य जगजाहीर असून भाजपावर एकही टिकेची संधी न सोडणार्‍या सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसेंशी महोत्सवात व्यासपीठावर असताना चर्चाही केली तसेच व्यासपीठ सोडण्यापूर्वी त्यांनी खडसेंशी हस्तांदोलन करीत त्यांचे आशीर्वादही घेतल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

बहिणाबाई महोत्सवाची क्षणचित्रे
महोत्सवाच्या दर्शनी भागात बहिणाबाईंच्या काळातील कुटी उभारण्यात आली होती. महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी सर्व मान्यवरांनी या कुटीला आवर्जुन भेट दिली

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, प्रवेशद्वारावर सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासह श्री विठ्ठल-रूखमाईच्या मूर्तीने लक्ष वेधले

महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे महोत्सवात आगमन झाल्यानंतर त्यांनी विद्यार्थिनींना हात उंचावून अभिवादन केले तसेच विद्यार्थिनींसोबत सेल्फी काढत त्यांना स्वाक्षरीही दिली

अहिल्यादेवी कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी ‘अरे खोप्यामध्ये खोपा’ तर के.नारखेडे विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी ‘माझी माय सरस्वती’ हे बहिणाबाईंच्या गीत एका तालासुरात म्हणून उपस्थितांची दाद मिळवली