जळगाव। जूनच्या सुरूवातीला आलेल्या पावसावर शेतकर्यांनी पिकांची पेरणी केली. त्यानंतर पावसाने दांडी मारल्याने शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. काही ठिकाणी समाधानकारक पाऊस नसल्याने पेरणीनंतर दीड महिन्यापर्यंत पाऊस नसल्याने दुबार पेरणीचे संकट होते. मात्र सध्या सुरू असणार्या संततधार पावसाने काही ठिकाणी पीकांना जीवदान मिळणार आहे. तर काडी ठिकाणी मात्र लवकर पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे होण्याची शक्यता ओढवणार आहे. पाचोरा आणि एरंडोल तालुक्यात मात्र आलेल्या पावसामुळे पिकांना जिवनदान मिळाले आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे पाचोर तालुक्यातील लहान नाल्यांना पाणी आले असून दुबार पेरणीचे संपुर्णपणे संकट टळले आहे. तसेच एरंडोल तालुक्यातील उत्राण आणि कासोदा भागात दमदार पाऊस झाल्याने शेतात पाण्याचे डबके तयार झाले होते. तर उमळदे, विखरण, खडके खेडी, पिंपळकोठा, पिंप्री या परीसरात पिके मोडणीवर आली असतांना अचानकपणे आलेल्या पावसामुळे पिकांवरील संकट टळले आहे. दरम्यान, रविवारी दिवसभर खान्देशातील बहुतांश ठिकाणी संततधार पाऊस सुरू होता.
काही ठिकाणी दुबार, तिबार पेरणीचे संकट
अमळनेर तालुक्यात इतर तालुक्यांपेक्षा परीस्थिती वेगळी असून दुबार आणि तिबार पेरणीचे संकट असूनही तालुक्यात पाणीटचाई समस्यज्ञ भेडसावत आहे. तालुक्यातील 29 गावांना पाणी टॅकर सुरु आहेत, त्यापैकी वासरे बु, खरदे बु, खेडी बु, खेडी खुर्द, खेडीसिम या गावांनी स्वतः हुन टॅकर बंद करून घेतले तर डांगर, पिपळे बु, धानोरा, देवगाव देवळी, अंचलवाडी, सबगव्हान, शिरसाळे बु, भरवस, लोणपंचम, सुंदरपट्टी, इंद्रापिप्री, पिपळे खु, कचरे, गडखांब, आर्डी, अनोरे, सारबेटे बु, निसर्डी, खडके, पिपळी प्रज, वाघोदे, जानवे मंगरूळ, भोरटेक, गलवाडे बु, गलवाडे खु या 25 गावांना भीषण पाणीटंचाई असून या गावांना टॅकरने पाणीपुरवठा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
नंदुरबार जिल्ह्यात पावसाची हजेरी
नंदुरबार । शहरासह जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने मुक्काम ठोकला असून शेतकर्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. हा पाऊस पिकांसाठी लाभदायक असला तरी मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. या पावसाने कपाशीच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र नदी नाले खळखळून वाहून निघाले असा पाऊस अद्यापही झाला नाही. यामुळे बहुतांश शेतकर्यांच्या पेरण्या बाकी आहेत. या एक महिन्याच्या कालवधीत किती पाऊस झाला, याची नोंद अद्याप महसूल विभागाने जाहीर केली नाही. तापमान मोजण्यासाठी लागणारी स्वतंत्र यंत्रणा नसल्याने पावसाची नोंद मिळण्यास अडचण येत आहे.
हतनूरचे आठ दरवाजे उघडले
हतनूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात गेल्या 24 तासांमध्ये झालेल्या रिपरिप पावसामुळे धरणाची जलपातळी रविवार 16 रोजी वाढली. यामुळे धरणाचे चार दरवाजे अर्धा मिटरने तर चार दरवाजे एक मीटर असे आठ दरवाजे उघडून विसर्ग केला जात आहे. यामुळेेे गेल्या तीन महिन्यांपासून कोरडेठाक असलेल्या नदी पात्रात पाणी खळखळून वाहू लागले आहे. हतनूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात अद्यापही समाधानकारक पाऊस नसल्याने पाण्याची आवक कमीच आहे. दरवर्षी जून महिन्यात हतनूर धरणाचा साठा वाढून विसर्ग केला जातो. यंदा मात्र जुलै उजाडूनही हतनूरमध्ये पाहिजे त्या प्रमाणात पाण्याची आवक नाही. शनिवारपासून हतनूरच्या पाणलोटक्षेत्रात रिपरिप पावसाने हजेरी दिली. यामुळे धरणातील जलसाठा काही प्रमाणात वाढल्याने शनिवार 15 रोजी रात्री 10 वाजता 2 गेट अर्धा मिटरने नंतर 6 गेट उघडण्यात आले होते. रविवार 16 रोजी विसर्ग वाढविण्यात आला आहे. चार दरवाजे अर्धा मिटरने तर चार दरवाजे एक मिटरने असे आठ दरवाजे उघडून तापीपात्रात 164 क्युसेक अर्थात 5 हजार 792.48 क्युसेक प्रतीसेकंद वेगाने विसर्ग करण्यात आला. दरम्यान रविवारी विसर्गानंतरही धरणात 208.640 मीटर जलपातळी, 158.70 दलघमी जलसाठा तर 10.07 टक्के जलसाठा कायम होता.
जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा कायम
धुळे । जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारली असून शेतकर्यांना पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी दुबार पेरणी झाली असून तिबार पेरणीचे संकट येऊन ठेपले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा हवालदिल झाला आहे. गेल्या आठ दिवसापासून जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक आणि रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला मात्र दिलासादायक नाही. रविवारी जिल्ह्यातील धुळे,साक्री,शिंदखेडा तालुक्यात ढगाड वातावरण दिसून आले. तर शिरपूर तालुक्यात काही ठिकाणी अधून मधून सरी बरसल्या. दरम्यान शेतकर्यांना पावसाची प्रतीक्षा कायम असून अजून आठवडाभर पाऊस नाही आला तर तिबार पेरणीचे संकट नाकारता येणार नाही.