मुंबई:- राहुरी कृषी विद्यापीठाचे भाग करून खादेशात जळगाव, धुळे, नंदुरबारसाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठ करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आपल्या भागातील प्रकल्पांवर अन्याय होत असल्याबाबत सोमवारी पावसाळी अधिवेशनात सरकारला फैलावर घेतल्यानंतर कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी विशेष बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते. ती बैठक आज कृषिमंत्र्यांच्या दालनात पार पडली. या बैठकीत खान्देशातील विविध कृषी प्रकल्पांवर सकारात्मक चर्चा झाली असून खान्देशात कृषिला ‘अच्छे दिन’ येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. खान्देशात कृषी विद्यापीठा संदर्भात अहवाल शासनाकडे आला असल्याची माहिती एकनाथराव खडसे यांनी दिली.
पाल हर्टीकल्चर कॉलेजसाठी जमीन घेणार
जिल्ह्यातील पाल येथे प्रस्तावित असलेल्या हर्टीकल्चर कॉलेजची 1 वर्षांपूर्वी घोषणा होऊनही कार्यवाही केली गेली नव्हती. या बैठकीत या कॉलेजसंबंधी चर्चा झाली असून तात्काळ जमीन ताब्यात घेण्याबाबत कार्यवाही केली जाणार असल्याचे आश्वासन कृषिमंत्र्यांनी दिले. पालमधील वरील भागात असलेल्या जमिनीला अडचण येत असेल तर खालच्या पट्ट्यात जमीन घेण्यासबंधी चर्चा बैठकीत झाली.
मुक्ताईनगर कृषी महाविद्यालयाकरिता 8 कोटी मंजूर
मुक्ताईनगर कृषी महाविद्यालयाचा प्रलंबित बांधकामाचा विषय देखील या बैठकीत मार्गी लागला. या बांधकामासाठी 25 कोटी खर्च प्रस्तावित असून आजच्या बैठकीत 8 कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. बांधकाम याच महिन्यात लगेच सुरू करणार असल्याचे सांगितले असून टेंडर निघाले असल्याची माहिती आहे. याचबरोबर बनाना टिशू कल्चर संशोधन केंद्र हिंगोनासाठी नकारात्मक रिपोर्ट आल्यानंतर यासाठी जळगावला लॅब आणि काम हिंगोने येथे होणार असल्याची मंजुरीही आज दिली गेली. सोबतच लिंबूवर्गीय संशोधन केंद्र चाळीसगावसाठी प्रस्ताव मागविला असल्याची माहिती आहे.
◆ खडसे इफेक्ट कायम!
:- खडसे यांनी त्यांच्या काळात मंजूर केलेल्या प्रकल्पांना स्थगिती आणि इतरत्र हलविल्याच्या मुद्द्यावरून फडणवीस सरकारची लक्तरेच काढली होती. अधिवेशनात खडसे यांची आपल्या समस्यांवर आक्रमक भूमिका राहिली असून त्यांनी वेळोवेळी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. प्रकल्प रखडले, महाविद्यालये इतरत्र हलविली या प्रकरणांमुळे नेमका अन्याय कुणावर होतोय? नाथाभाऊंवर होतोय की खान्देशावर? यामध्ये काय राजकारण आहे? असा खडा सवाल केल्यानंतर कृषीमंत्र्यांनी तात्काळ बैठकीचे निर्देश दिले होते. त्यानंतर मंगळवारी ठरलेली बैठक कुलगुरू नसल्याने रद्द करण्यात आली होती.
विद्यापीठासंबंधी अहवाल राज्य शासनाकडे
राहुरी कृषी विद्यापीठाचे विभाजन करून स्वरूपाचे विद्यापीठ जळगाव, धुळे,नंदुरबार जिल्ह्यांकरिता निर्माण करण्याबाबत कृषी विद्यापीठाचा अहवाल राज्य सरकारकडे आला आहे. हे विद्यापीठ तीन जिल्ह्यांपैकी नेमके कुठे होणार? हे अद्याप ठरले नसले तरी खान्देशातच होण्याबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती आहे. यासाठी एक स्वतंत्र समिती कार्यरत असून समितीच्या शिफारशीनंतरच तीन जिल्ह्यांपैकी विद्यापीठ कुठे करायचे? हे ठरणार असल्याचे खडसे यांनी सांगितले. या बैठकीला कृषिमंत्र्यांसह आमदार एकनाथराव खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, कृषी विभागाचे सचिव व अन्य अधिकारी उपस्थित होते.