एकही योजना, प्रकल्प नाही, निधीचीही वाणवाच
चार मंत्री असतानाही विभागाला पानेच पुसली
मुंबई (निलेश झालटे): – राज्याच्या राजकारणात खान्देशचे महत्व वेगळे आहे. खान्देशातील नेत्यांनी अनेकदा सभागृह गाजविले आहे. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मात्र खान्देशला गाजरच मिळाले असल्याचे चित्र आहे. ना. गिरीश महाजन आणि जयकुमार यांच्यासारखे दोन महत्वाचे कॅबिनेट मंत्री तर मुलुख मैदानी तोफ अशी ओळख असणारे गुलाबराव पाटील आणि दादाजी भुसे यांच्यासारखे राज्यमंत्री मंत्रिमंडळात असताना आणि भाजपच्या कोअर टीममध्ये असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे याच क्षेत्रातील असताना देखील खान्देशच्या वाटणीला अर्थसंकल्पात पानेच पुसली गेली आहेत. हा अर्थसंकल्प अत्यंत निराशाजनक असल्याचे मत खान्देशातील विरोधी पक्षाच्या आमदारांनी सांगितले तर गाजर मिळाल्याची कबुली काही भाजपच्या आमदारांनी नाव सांगण्याच्या अटीवर दिली आहे.
तिन्ही जिल्हे वंचित
खान्देशात अनेक उद्योग आणि महत्वाचे प्रकल्प रखडलेले आहेत. या प्रकल्पांना अर्थसंकल्पात नवसंजीवनी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र अर्थसंकल्पात जळगाव, धुळे, नंदुरबारसाठी काहीही मिळालेले नाही. खान्देशातील रखडलेल्या प्रकल्पांविषयी एकनाथराव खडसे यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. मुक्ताईनगर शासकीय कृषि महाविद्यालय, संशोधन केंद्र, पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ विभाजन करून एक विद्यापीठ, अवजारे कृषी संशोधन केंद्र, टिश्यू कल्चर केंद्र, हर्टीकल्चर काॅलेज आणि अन्य अनेक प्रकल्प खान्देशात घोषित करण्यात आले आहेत. ग्रामीण रस्ते, पांदण रस्ते, पाझर तलाव दुरुस्ती यासंह केळी या प्रमुख पिकासाठी काहीतरी घोषणा होईल असे वाटले होते मात्र खान्देशच्या कुठल्याही प्रश्नावर या अर्थसंकल्पात उतारा दिलेला नाही.
अधिवेशनात आता खडसेंच्या भूमिकेकडे लक्ष
मागील अधिवेशनापासून आपल्या भागातील समस्या आणि प्रश्नांवरून सरकारचे वाभाडे काढण्याचे काम माजी मंत्री खडसे यांनी सुरु केले आहे. या अधिवेशनात खान्देशाला न्याय न मिळाल्यास आवाज उठवण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. अर्थसंकल्पात खान्देशच्या तोंडाला पाने पुसली गेल्याने अधिवेशनात इथून पुढे खडसे यांच्या रुद्रावताराचा सामना सरकारला करावा लागण्याची चिन्हे आहेत. बाकी खडसे वगळता खान्देशातील एकही आमदार आपल्या भागातील समस्या किंवा प्रश्नासाठी भांडताना सभागृहात दिसून येत नाही.