पुणे- ‘बहिणाबाईंच्या गाण्याचा आणि खान्देशी बाण्याचा’, खान्देशी संस्कृतीची दरवळ असलेला बहुचर्चित असा ‘मोल’ चित्रपट २३ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषेत प्रदर्शित झाला. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील कासारे या छोट्याश्या खेड्यातील योगेश कुलकर्णी यांनी या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले आहे. प्रदर्शनानंतर चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सद्यस्थितीत बॉलीवूड आणि मराठीचे खूप चित्रपट प्रदर्शित झालेले आहे. या चित्रपटाच्या जोडीला आपले स्थान टिकविले आहे. चित्रपटाच्या कथेमुळे आणि कलाकारांच्या अभिनयामुळे ‘मोल’ चाहत्यांच्या पसंतीला उतरला आहे. चाहत्यांकडून मोलला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
पुण्यात या चित्रपटाला अपेक्षित लोकप्रियता मिळत आहे. पुण्यातील मल्टीप्लेक्स आणि पीव्हीआर थिएटरमध्ये चित्रपटाला प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला आहे. महागडी अशी तिकीटे काढून गर्दी होत आहे हेच या चित्रपटाचे यश मानले जात आहे. बूक माय शो या लोकप्रिय अॅपने ‘मोल’या चित्रपटाला ८४ टक्के रेटिंग दिले आहे. ही बाब समस्त खान्देशवासियांसाठी आनंदाची बाब आहे.
जळगाव येथील पारस बाविस्कर या उच्चशिक्षित तरुणाने रत्नांजली मीडियाच्या माध्यमातून हा चित्रपट प्रस्तुत केला आहे.
किशोर कदम ‘सॉमित्र, मिलिंद शिंदे या दिग्गज कलाकारांसोबत धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार या चारही जिल्ह्यातील ५० पेक्षा अधिक कलावंतांचा ‘मोल’मध्ये समावेश आहे. योगेश कुलकर्णी व शीतल अहिरराव हे चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. प्रसिद्ध रंगकर्मी अनिल मोरे, साक्रीचे प्रा.संजय भदाणे खलनायकाची भूमिका करत आहे. राजन पवार, सुभाष शिंदे, योगेश निकम या युवा कलाकारांसोबत रमाकांत देसले, नलिनी कुलकर्णी या ज्येष्ठ कलावंतानी देखील ‘मोल’मध्ये भूमिका साकारली आहे. ‘आयतं-पोयतं सख्यानं’ हा धमाल एकपात्री प्रयोग गाजवत असलेल्या प्रवीण माळी यांचाही या चित्रपटात महत्वपूर्ण रोल आहे.
खान्देशचा अभिमान असलेल्या खान्देश कन्या कवयत्री बहिणाबाईंची गाणी विठ्ठल वाघ, कमलाकर देसले, अश्विनी शेंडे, अनिल अवचट या नामवंतांच्या प्रतिभावान लेखणीतून उतरलेली दर्जेदार गाणी, अविनाश-विश्वजित आणि श्याम क्षीरसागर यांचे मधुर संगीत यामुळे मोलची गाणी लोकप्रिय आणि अतिशय श्रवणीय झाली आहे. संगितकार हरिहरन, सुरेश वाडकर, रवींद्र साठ्ये, वैशाली सामंत, साधना सरगम, नंदेश उमप, ऋषिकेश रानडे अशा १२ दिग्गज गायकांच्या गाण्यांचा समावेश मोल चित्रपटात आहे.
लोककलेचे दर्शन
कानबाई सप्तशृंगी माता, धनदाई माता, सखाराम महाराज या सारखी खान्देशी श्रद्धास्थाने, खानदेशचे सण उत्सव, लोकगीते, म्हणी, खान्देशी चवदार खाद्य, संस्कृती या सर्वांचे दर्शन घडविणारा हा चित्रपट आहे.
या खान्देशी संघटनांकडून मिळत आहे सहकार्य
सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते चित्रपटाचे संगीत अनावरण मुंबईत दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाले. झी म्युझिकसारख्या नामवंत कंपनीने ‘मोल’च्या संगीताचे हक्क प्राप्त केले आहे. पुणे, सांगवी येथील अहिराणी शब्दबंधन, पिंपरी-चिंचवड येथील अहिराणी कस्तुरी परिवार, निगडी येथील खान्देश सांस्कृतिक विकास संस्था इत्यादी चित्रपटाच्या प्रचाराचे निमित्त साधून खान्देश क्लबची स्थापना करण्यात आली.
प्रत्येक कुटुंबीयांनी सहपरिवार हा चित्रपट पाहावा अशी या चित्रपटाची कथा आहे. दरम्यान संस्कृतीच्या प्रचारासाठी प्रोत्साहित असलेल्या या चित्रपटाला अधिकाधिक प्रेक्षकांची साथ हवी आहे, प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहावे असे आवाहन प्रस्तुतकर्ते पारस बाविस्कर व निर्माते योगेश कुलकर्णी यांनी केले आहे.