अवघ्या अडीच तासातच शहरवासियांनी संपविले भरीत
जळगाव – येथील मराठी प्रतिष्ठानतर्फे शुक्रवारी शहरातील सागरपार्कवर भरीत महोत्सव पार पडला. यात प्रसिध्द शेफ विष्णू मनोहर यांच्यासह तब्बल 125 कारागिरांनी सहा तासात 3 हजार किलो खान्देशचे स्पेशल भरीत बनविण्याचा विश्वविक्रम केला. अवघ्या अडीच तासातच शहरवासियांनी संपूर्ण भरीत संपविले होते. मोठ्या संख्येने गर्दी करीत नागरिकांनी स्वादीष्ट खान्देशी भरीताचा आस्वाद घेतला.
वांग्यांच्या माळा टाकून मान्यवरांचे स्वागत
भरीत महोत्सवाला आमदार सुरेश भोळे, बेटी बचाव एटी पढोओचे संयोजक डॉ. राजेंद्र फडके, कामत गृप ऑफ हॉटेलचे संस्थापक डॉ. विठ्ठल कामत, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. मराठी प्रतिष्ठानतर्फे अध्यक्ष अॅड. जमील देशपांडे, विजय वाणी यांनी छोट्या छोट्या वांग्यांच्या माळा घालून अनोख्या पध्दतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले. ढोल-ताशांचा गजर, उत्कृष्ट समालोचन, शेरोशायरी याव्दारे उत्साहपूर्ण वातावरणात भरीत तयार झाले.
नागरिकांची बोचर्या थंडीतही सकाळपासून सेल्फीसाठी गर्दी
भरीत बनिवण्याचा विश्वविक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी नागरिकांनी बोचर्या थंडीतही पहाटे सहा वाजेपासून सागरपार्क मैदानावर गर्दी करण्यास सुरुवात केली. अनेकांनी भरीत बनविण्याचा व्हिडीओ केला, तर काहींनी विष्णू मनोहर यांच्यासह तयार करण्यात येत असलेल्या भरीतासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली. याठिकाणी भरीत बनविण्याची प्रक्रिया दिसावी म्हणून नागरिकांसाठी मोठे स्क्रीनही लावण्यात आले होते. अनेक महिला पुरुषांनी विष्णू मनोहर यांच्यासह विठ्ठल कामत यांच्यासोबत सेल्फी काढले.
2 महिन्यानंतर मिळणार विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र
यापूर्वी भरीत बनविण्याचा असा कुठलाही विक्रम झालेला नाही. त्यामुळे या विश्वविक्रमी भरीताची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिमका बुक ऑफ रेकॉर्ड, इंडीया बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात येणार आहे. जगात जळगाव शहरात पहिल्यांदाच 3000 किलो भरीत बनविण्याचा विश्वविक्रम झाला. या विश्वविक्रमी भरीताची नोंद घेण्यासाठी नागपूर येथून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डचे गौरव द्वेदी, मिलींद देशकर, विजय जथे, यांच्यासह 30 ते 40 जणांचे पथक जळगावात आले होते. विश्वविक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार पंकज लोखंडे यांच्यासह कर्मचारी हे सर्व खाद्यपदार्थांच्या मोजमापाची नोंद घेत होते. दोन महिन्यानंतर मराठी प्रतिष्ठानला विश्वविक्रमाबाबत प्रमाणपत्र मिळणार असल्याचे नागपूर येथील आलेल्या प्रतिनिधींनी सांगितले.
125 कारागीरांनी 6 तासात बनविले 3000 किलो विश्वविक्रमी भरीत
पहाटे 6 वाजेपासून भरीत बनविण्याच्या पूर्वतयारीला सुरुवात झाली. 10.30 वाजेच्या प्रसिध्द शेफ विष्णू मनोहर त्यांच्या टीमसह सागरपार्कवर दाखल झाले. सहा तासात म्हणजेच 12.02 वाजता विश्वविक्रमी भरीत तयार झाले होते. भरती बनविण्यासाठी 10 बाय 10 फुटाचा व्यास असलेली तळाला लोखंडी बुड व 4 फुटाची स्टीलाची कॉलर, एकाच वेळी 20 माणसे बसू शकतील एवढी मोठी स्टेनलेस स्टिल कढई स्वंतत्ररित्या कोल्हापूर येथून बनिवण्यात आली होती. 2.5 फुट बाय 1.5 फुटाचे पाते व 10 फुट दांडी असलेला सरोटा वापरण्यात आला. विश्वविक्रमी भरीत बनविण्यासाठी 4 किलो वजन पेलू शकणारी भव्य चुल बनिवण्यात आली होती. भरती बनविण्यासाठी वांगे 3 हजार 200 किेलो, शेंगदाणा तेल 120 किलो, मिरची 100 किलो, लसूण 50 किलो, शेंगदाणे 20 किेलो, जिरे 5 किलो, कोथिंबीर 100 किलो, मीठ जाड 25 किलो, तुरकाड्या 6 ट्रक, डाळींब झाडाच्या सुकलेल्या काड्या 2 ट्रॅक्टर व सरपण 2 मण लागले. भरीत बनविण्यासाठी विष्णू मनोहर यांच्यासह पाच जणांच्या सदस्यांसह 60 महिला, 40 पुरूष, 20 सुपरवायझर, 2 मुख्य निरीक्षकांनी काम पाहिले.