खारफुटीचा अतोनात र्‍हास, कधी कळणार हे गांधारी झालेल्या प्रशासनास

0

उरण । जेएनपीटीच्या जागेवर तीस वर्षांच्या करारावर वसवण्यात येत असलेल्या चौथ्या बंदराकडून आपल्या प्रकल्पाला बाधा ठरणारी खारफुटी थेट मशीनद्वारे समूळ उपटून काढली जात असल्याचे धक्कादायक चित्र या बंदराच्या परिसरात फेरफटका मारताना दिसून आले आहे. या बंदरात स्थानिकांच्या नोकरभारतीबाबत आजच्या तारखेपर्यंत तरी स्थानिकांच्या तोंडाला पाने पुसणार्‍या सिंगापूर पोर्टने पाणजे ते चौथे बंदर या पट्ट्यात असलेली थेट मशीन लावून काढून टाकली आहे. यासंदर्भात तालुक्याचे वन अधिकारी भिकाजी गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता आपल्याला याबाबत काही माहिती नाही आणि आपल्याला असे काही दिसून आले नसल्याची आंधळेपणाची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात र्‍हास
विशेष म्हणजे ज्या प्रमाणात या ठिकाणाची खारफुटी काढून टाकली जात आहे त्यातली एखादीदेखील पुन्हा रोपण केली जात नसल्याने पर्यावरणाचा मात्र मोठ्या प्रमाणात र्‍हास होत असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. एखाद्या शेतकर्‍याने आपल्या शेतालगत असलेल्या कांदळवन किंवा खारफुटी केवळ जळणाची लाकडे म्हणून तोडली असता कायद्याचा बडगा दाखवणारे प्रशासन चौथ्या बंदराकडून या प्रमाणात मोठ्या प्रमाणात खारफुटी मुळासकट उपटली जात असताना झोपी गेले आहे का, असा सवाल नरेश वामन भोईर या सामाजिक कार्यकर्त्याने विचारला आहे, तर याबाबत सिंगापूर पोर्टचे संचालक दादाजी जगताप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ते काम आमचं नसून जेएनपीटीचे असावे असे सांगून वेळ मारून नेल्याचे समोर आले आहे.

मशिनरी लावून खारफुटी मुळासकट काढली उपटून
या बंदराच्या अगदी भूमिपूजनापासूनच ते काही ना काही कारणाने सतत चर्चेत राहिले आहे. त्यामधील सर्वात मोठी चर्चा ही नोकरभरतीबाबत आहे. बंदराचा लोकार्पण सोहळा होऊन गेल्यावर ही बंदरात स्थानिकांच्या नोकरभारतीचा आकडा तीन अंकांवर पोहोचलेला नाही. याविरोधात स्थानिकांनी सातत्याने मोर्चे निदर्शने आंदोलने उपोषणे आणि फटकाफटकी अशी सगळी हत्यारे वापरून पाहिल्यावरही सिंगापूर पोर्टचे व्यवस्थापन आजतागायत स्थानिकांना बधलेच नाही. या पद्धतीने स्थानिकांना डिवचणार्‍या सिंगापूर पोर्टच्या प्रशासनाने या ठिकाणच्या पर्यावरणाचाही मोठ्या प्रमाणात र्‍हास तालुका प्रशासनाला गुंगारा देऊन चालवला आहे. सध्या या बंदराच्या दुसर्‍या टप्प्याच्या निमित्ताने समुद्राची खोली वाढवण्याचे काम सुरू आहे. त्याकरिता बंदर ते पाणजे गाव या मध्यल्या टप्प्यातला गाळ काढला जात आहे. मात्र, हे करताना सरळ सरळ मशिनरी लावून खारफुटी मुळासकट उपटून काढली जात आहे. यानिमित्ताने पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत असल्याचे समोर आले आहे.