खारफुटीची कत्तल चाळीमाफिया भोवली

0

कल्याण : ठाकुर्लीलगत कांदळवन खारफुटीचे तोड करुन त्या ठिकाणी बेकायदा चाळी बांधून सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून पर्यावरणाचा र्हास केल्याचा ठपका ठेवत मंडळ अधिकारी आर.एम.पिसे यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसानी चाळमाफियाविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

ठाण्यापाठोपाठ कल्याण, डोंबिवली शहरांच्या परिघात येणार्या खाडीकिनारी खारफुटींची बेसुमार कत्तल होत आहे. वाढती बेकायदा बांधकामे आणि त्याकडे होत असलेल्या शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेली जंगले नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. उच्च न्यायालयाने खारफुटीचे संवर्धन करण्याचे आदेश शासनाला दिले आहेत. खारफुटीच्या झाडांची मुळे पाणी धरून ठेवतात. त्यामुळे भूजल पातळी समतल ठेवण्यास ही झाडे महत्त्वाची भूमिका बजावतात. मागील काही वर्षांपासून मात्र कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत खाडीकिनारी बेसुमार बेकायदा बांधकामांची उभारणी सुरू झाली आहे.

या बांधकामांनी खारफुटीच्या जंगलांना अक्षरश: गिळून टाकले असून खारफुटी नष्ट करणार्या भूमाफियांवर, विकासकांना चेव चढले आहे. खारफुटी तोडून नष्ट करण्यात आलेल्या बांधकामांच्या माध्यमातून भूमाफिया गलेलठ्ठ झाले आहेत. ठाकुर्ली मोठागाव येथील खारफुटीच्या जागेवर खारफुटीची कत्तल करत मोठ्या प्रमाणात भूमाफियांनी चाळीचे बांधकाम सुरू केले आहे. या ठिकाणी मंडळ अधिकार्यांच्या पथकाने पाहणी करत खारफुटीचे तोड करत त्या ठिकाणी बेकायदा चाळी बांधून सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून पर्यावरणाचा र्हास केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आहे.