खारबांव गांवात दारू बंदीचा ग्रामसभेत निर्णय

0

भिवंडी – भिवंडीतील खारबाव गावातील ग्रामस्थांनी संपूर्ण गांव दारूबंद करण्याचा निर्णय घेतला आहे.यासाठी एका विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.या ग्रामसभेत महिलांसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.विशेष म्हणजे गावात दारूबंदीचा निर्णय जरी घेण्यात आला असला तरी कुणी ना कुणी छुप्या मार्गाने गावठी दारू बनविण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे गावात व आजूबाजूच्या परिसरात दारू बनविण्यासाठी लागणारा नवसागर,काळा गुळ व इतर कच्चा माल अशा वस्तूही कोणी गावात आणू नये असाही निर्णय या ग्रामसभेत घेण्यात आला आहे.

मात्र यासाठी पोलीस यंत्रणेच्या मदतीचीही आवश्यकता असून तालुका पोलिसांनी या दारूबंदी मोहिमेला सहकार्य करून या परिसरात दारू बनविणाऱ्या व विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशीही मागणी ग्रामस्थांनी या ग्रामसभेत केली आहे.दारूबंदीसाठी आयोजित केलेल्या या विशेष ग्रामसभेत खारबांव ग्रामपंचायतीच्या सरपंच वैशाली रमाकांत पाटील,उपसरपंच अशोक पालकर,पोलीस पाटील किरण मुकादम,नागेश मुकादम ,ग्राम विकास अधिकारी बी.बी.पाटील,ग्रा.पं.सदस्य महेंद्र पाटील आदींसह खारबांव गांवातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक ,महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या दारूबंदीच्या निर्णयाचे महिला वर्गाकडून स्वागत करण्यात येत आहे.