मुंबई – खार येथे कारच्या धडकेने नरसप्पा बोंतल कुंठा नावाचा एक 42 वर्षांचा मुकादम गंभीररीत्या जखमी झाला. त्याच्यावर वांद्रे येथील भाभा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे. याप्रकरणी खार पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला असून पळून गेलेल्या चालकाचा पोलीस शोध घेत आहेत. हा अपघात काल दुपारी सव्वादोन वाजता खार येथील अकरावा रोड, आरे सरीता केंद्राजवळील फेलीसिटी पार्क आणि रामकृष्ण रुग्णालयासमोर झाला. नसप्पा कुंठा हा खार येथील अनिरुद्ध बापू आश्रमाजवळील जसवंत व्हिला साईटवर मुकादम म्हणून काम करतो. काल दुपारी सव्वादोन वाजता तो त्याच्या मित्रांसोबत फेलीसिटी पार्कसमोर गप्पा मारीत होता. यावेळी तेथून भरवेगात जाणार्या एका मारुती कारचालकाने त्याला जोरात धडक दिली.
अपघातात नरसप्पा हा गंभीररीत्या जखमी झाला होता. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने जवळच्या भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. कारचालक पोलिसांना कोणतीही माहिती न सांगता तसेच जखमीला वैद्यकीय मदत न करता पळून गेल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजवरुन पळून गेलेल्या कारचालकाचा शोध सुरु आहे.