खालापूरजवळ साखरेचा ट्रक उलटला

0
एक ठार एक जखमी
तळेगाव दाभाडे : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खालापूरजवळ भरधाव वेगातील साखरेचा ट्रक समोर जाणार्‍या टँकरला धडक देऊन उलटल्याने झालेल्या अपघातात ट्रकचा क्लिनर जागीच ठार झाला असून चालक जखमी झाला आहे. आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास किमी 36 जवळ हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार पहाटेच्या सुमारास भरधाव वेगात मुंबईच्या दिशेने साखर घेऊन जात होता. ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने समोर जाणार्‍या टँकरला मागून जोरात धडकला व रस्ता दुभाजकाला लावण्यात आलेल्या ब्रायफ्रेन रोपवर सुमारे 150 फुट घासत जाऊन उलटला. यामध्ये गाडीतील क्लिनर रस्त्यावर पडलेल्या साखरेच्या पोत्यांखाली अडकल्याने त्याचा मृत्यू झाला तर चालक गाडीतच अडकून जखमी झाला. बोरघाट व खोपोली पोलीस, देवदूत यंत्रणा, आयआरबी पथक व अपघातग्रस्तांच्या मदतीला या सामाजिक संस्थेचे कार्यकर्त्यांनी चालकाला गाडीतून बाहेर काढून उपचाराकरिता रवाना केले. मोहम्मद सुलतान असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या क्लिनरचे नाव असून चालक मोहम्मंद मुज्जफिर हा जखमी झाला. दोघेही जमानगड, हरियाणा येथील रहिवाशी आहेत.