खालापुर । अनेक वर्षे भेडसावणार्या पाणीटंचाईची समस्या खालापूर तालुक्याच्या मानगुटीवरून उतरण्यास तयार नसून डोक्यावर घागर घेऊन पाण्यासाठी पायपीट आजही कायम असून, परिस्थितीत काहीच बदल घडलेला नाही. विकासाची गंगा शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधीमार्फत खेडोपाडी, दुर्गम भागापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे व्यवस्थापन आहे. तालुक्यात चार मोठी धरणे व इतर लहान धरण असताना, खालापूरला टँकरग्रस्त तालुका म्हणून ओळखले जाते हे मोठे दुर्दैव आहे. वर्षानुवर्षे तहानलेली गावे व वाड्याची संख्या तशीच आहे. तालुक्यातील भीषण पाणीटंचाई जाणवत असलेली गावे व वाड्यांची संख्या 2016 मध्ये 85 च्या घरात होती. 2017 मध्येही या आकडेवारीत काही फरक पडला नव्हता. जानेवारी उजाडताच आबालवृद्ध, महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी फरफट सुरू झाली. आहे.
जेमतेम तीन चार दिवसच पाणी पुरते
चार मुख्य धरणाच्या जोडीला दोन लहान धरणात प्रचंड जलसाठा उपलब्ध असूनही, केवळ प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे पावसाळा संपला की, तालुक्यात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागते, अनेक गावांतून विशेषतः आदिवासी वाडीतून पिण्याचे पाणी आणण्यासाठी महिलांची पोराबाळासह वणवण सुरू होते. दिवसभर मोलमजुरी करून घराबाहेर राहाव्या लागणार्या महिलांची तर कामावरून परतल्यानंतर पाण्यासाठी चांगलीच ओढाताण होते. यंदाच्या टंचाई आराखड्यात 26 गावे आणि 49 वाड्याचं समावेश करण्यात आला आहे. नऊ गावे व 20 वाड्याना नवीन विधन विहीर प्रस्थावित असून, टँकरने पाणीपुरवठा करावी लागणारे गावे 26 तर 29 वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. नवीन नळपाणीपुरवठा योजनेसाठी 4 गावे व 5 वाड्या समाविष्ट करण्यात आल्या आहेत. उन्हाळ्यात जरी वाड्यामधून टँकरने पाणी पुरवले जात असले, तरी पंधरा दिवसातून एकदा येणार्या टँकरचे पाणी विहारात सोडल्यानंतर जेमतेम तीनचार दिवसच पाणी पुरते.