जळगाव । गाळेधारकांच्या नियोजित मोर्चांत सहभागी होण्यास खाविआचे स्वीकृत नगरसेवक कैलासअप्पा सोनवणे यांनी नकार दिल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागणार असल्याचे समजते. गाळेधारकांच्या मोर्चांत सहभाग न होेण्याच्या भूमिकेवरून कैलासअप्पा सोनवणे यांना राजीनामा द्यावा लागेल असे खाविआचे नेते रमेशदादा जैन यांनी सूचित केले होते. सोनवणे हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यानेच त्यांना राजीनामा देण्याचे सांगण्यात आले आहे.
दहा वाजता गाठले जिल्हाधिकारी कार्यालय
कैलासअप्पा सोनवणे राजीनामा देण्यासाठी सकाळी दहा वाजताच जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते. जिल्हाधिकारी बाहेरगावी गेल्याने सोनवणे यांनी त्यांच्या स्वीय सहाय्यकास राजीनामा घेण्याची विनंती केली. मात्र,स्वीय सहाय्यकांनी कायद्यात तशी तरतूद नसल्याचे सांगून त्यांचा राजीनामा स्वीकारण्यास नकार दिल्याचे समजते. यानंतर कैलासअप्पा सोनवणे यांनी महापालिकेत जाऊन उपायुक्त चंद्रकांत खोसे यांच्याकडे राजीनामा सादर केला. सोनवणे यांचा राजीनामा उपायुक्तांनीदेखील कायद्यात तरतूद नसल्याचे कारण सांगून स्वीकारला नसल्याचे समजते. यावेळी उपायुक्त खोसे यांनी त्यांना महापालिका अधिनियमाचे पुस्तक दाखवून नियम समजवून सांगितला. नगरसेवक यांचा राजीनामा केवळ आयुक्त स्वीकारू शकत असल्याचे स्पष्ट केले.
व्हॉटस्अपवर राजीनामा व्हायरल
राजीनामा स्वीकारला नाही तर स्पीड पोस्टने राजीनामा पाठविणार असल्याचे सोनवणे यांनी उपायुक्तांना सांगितले. दरम्यान,सोनवणे यांनी दोन ओळींचा राजीनामा व्हॉटस्अप ग्रुपला सकाळीच व्हायरल केला होता. सोनवणे यांच्या पत्नी भारती सोनवणेदेखील नगरसेविका आहेत. मात्र, त्यांना आतापर्यंत स्थायी समिती, महिला व बालकल्याण समितीचे सदस्यत्वदेखील दिले नसल्याने त्यांच्यात नाराजी होती असे समजते. 5 हजार व्यापार्यांसाठी 5 लाख नागरिकांना वेठीस धरण्यास सोनवणे यांचा विरोध आहे.