खासगी आयुष्यात ढवळाढवळ करणार्‍यांवर कठोर कारवाई!

0

मुंबई । एखाद्या व्यक्तीचे दूरध्वनीद्वारे झालेले संभाषण चोरून ऐकणे, खासगी माहिती गोळा करणे यातून एखाद्या व्यक्तीला गंडविण्याचे काम करणार्‍यांवर कारवाईसाठी कायदे अधिक कठोर करण्यात येऊन याप्रकरणी दोषी आढळणार्‍यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्‍वासन गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिले. एखाद्याची खासगी माहिती मिळवून त्याचा गैरवापर करणे गुन्हा असताना व ही माहिती मिळवण्यासाठी वापरण्यात येणार्‍या यंत्रावर बंदी असताना राज्यात अनेक ठिकाणी असे गुन्हे उघड झाले आहे. याबाबत आमदार आर्किटेक्ट अनंत गाडगीळ यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी उपस्थित केली.

गंडवण्याचे प्रकार
देशातील पहिल्या खासगी गुप्तहेर महिलेला एका गुन्हासंबंधात अटक करण्यात आली आहे. मात्र, राज्यात अनेक वैयक्तिक हव्यासापोटी कुठल्याही थराला जाऊन वैयक्तिक माहिती चोरली जाते. गुप्त माहिती मिळविण्यासाठी कॉल रेकॉर्ड भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून मोबाईल कंपन्याकडून माहिती मिळवीली जाते. उद्योगपती, राजकीय नेते, सिनेमा जगतातील व्यक्ती, तरूणी यांची वैयक्तिक माहिती चोरून त्यांना गंडविण्यात येते. यावर उपाययोजना करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

वैयक्तीक माहिती मिळविण्यासाठी यंत्र विकसित झालेय
एखादी वैयक्तीक माहिती मिळविण्यासाठी यंत्र विकसित झाले असून याबाबत सार्वजनिकरित्या मोठ्या प्रमाणात सर्रासपणे जाहिरातबाजी होत आहे. अशा प्रकारच्या यंत्रावर बंदी असतांना होणार्‍या जाहिरातीवर निर्बंध लादण्याची मागणी करण्यात आली. याबाबत पोलीस महासंचालक यांना निर्देश देऊन अशा प्रकारच्या जाहिरातीवर निर्बंध घालण्याबाबत सांगण्यात येईल असे ग्रूहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी सांगितले.