पिंपरी-चिंचवड : शहरातील खासगी क्लासचालकांची मनमानी सुरू आहे. खासगी क्लासचालकांकडून केली जाणारी शुल्क वाढ, प्रवेश देण्यासाठी मनाप्रमाणे असलेली क्लासची वेगवेगळी नियमावली यामुळे पालकवर्ग पुरता हैराण झाला आहे. भरमसाठ फी घेऊनच विद्यार्थ्यांना क्लासमध्ये प्रवेश दिला जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. त्याच क्लासमध्ये शिकणार्या विद्यार्थ्याला कमी गुण मिळाल्यास पुढील वर्गासाठी प्रवेश नाकारला जात असल्याने क्लासचालकांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाने पावले उचलावीत, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.
क्लासचालकांकडून पालकांची अडवणूक
शाळेमध्ये शिकणार्या पाल्याला चांगले व दर्जेदार शिक्षण देण्याची पालकांची इच्छा असते. स्पर्धेत व गुणवत्तेत आपला मुलगा पुढे रहावा, यासाठी शाळेतील शिक्षणासह पालकांकडून खासगी क्लासदेखील लावले जातात. अशा प्रकारचे क्लास घेणार्यांची संख्याही पिंपरी-चिंचवड शहरात अधिक आहे. मात्र, अनेक क्लासचालकांकडून विविध कारणावरून पालकांची अडवणूक केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत.
गैरप्रकारावर अंकुश लावण्याची मागणी
अगोदरच शाळांकडून मोठ्याप्रमाणात आकारण्यात येणारे शुल्क, पुस्तके, गणवेश, सहल यासह शाळेतील इतर कार्यक्रमांचे शुल्क या खर्चांमुळे पालक मेटाकुटीला आलेले असतात. अशातच खासगी क्लासमुळे तर पालकांवर अधिकच आर्थिक बोजा पडत आहे. खासगी क्लासचालकांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने मनमानी पद्धतीने फि वसुली केली जात आहे. याबाबत पालकवर्गाकडून तक्रारी होऊ लागल्या असून, शिक्षण विभागाने खासगी क्लासचालकांवर अंकुश लावावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.