पोलादपूर । मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महत्वाचे ठिकाण असलेल्या पोलादपूर एसटी स्थानकामधून कोकण विभागीय पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता धुडकावून राजकीय व्यक्तींच्या हस्ते नारळ फोडून सुरू झालेली पोलादपूर ठाणे शिवशाही बस आज मंगळवारी सकाळी चक्क त्याच तिकीटदरामध्ये निमआराम बस सोडण्यात आल्याने संशयाच्या फेर्यात अडकली आहे. पोलादपूर एसटी स्थानकाच्या 100 मीटर्स परिघात खासगी प्रवासी वाहतूक करणार्या वाहतुकदारांचा पोलादपूर एसटी स्थानकातून सुटणार्या एसटी सेवेला फास बसला असून, यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवासी वर्गाला मुंबई, पुणे, ठाणे या शहरी भागात जाण्यासाठी खासगी प्रवासी वाहतुकीखेरीज निर्माण झालेला शिवशाही बसचा सक्षम पर्याय मृतवत झाल्याचे मानले जात आहे.
1 जून 2018 रोजी पोलादपूर एसटी स्थानकामधून विद्यमान आ.भरतशेठ गोगावले आणि विद्यमान रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य चंद्रकांत कळंबे यांचा वाढदिवस असल्याचे औचित्य साधून पोलादपूर ठाणे शिवशाही बसची कंत्राटी एसटी प्रवासी सेवा सुरू करण्यात आली. कोकण विभागीय पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता या दिवशी असूनही राजकीय व्यक्तींच्या उपस्थितीत या सेवेचा शुभारंभ करताना ही सेवा एसटी महामंडळाची कंत्राटी सेवा असल्याने आचारसंहिता लागू नाही, असे कारण संबंधित उपस्थित अधिकार्यांकडून सांगण्यात आले होते. या शिवशाही बस सेवेचा पोलादपूर एसटी स्थानकाच्या परिसरातील खासगी प्रवासी वाहतूक करणार्या बससेवेच्या धंद्यावर अनिष्ट परिणाम झाला. यानंतर अनियमितपणे सुरू राहिलेली पोलादपूर ठाणे शिवशाही बससेवा आज मंगळवारी दि. 12 जून रोजी सकाळी 7 वाजता शिवशाहीऐवजी चक्क हिरव्या रंगाची जुनी पुराणी निमआराम बस दिल्यामुळे प्रवाशांना तिकिटाचा भुर्दंड सोसावयास लावणारी ठरली. आकाश शेवाळे या विद्यार्थ्याने पोलादपूर ते ठाणे या शिवशाही बसचे लोणेरे ते ठाणे, असे 236 रुपयांचे आरक्षित तिकीट काढून प्रवासासाठी लोणेरे येथे शिवशाही बसची वाट पाहिली, तर त्याऐवजी चक्क हिरव्या रंगाची निमआराम बस आल्याचे पाहून त्यास धक्का बसला. त्यामुळे त्याने सदर निमआराम बसचे वाहक ए.एच.मिंडे यांच्याकडे तक्रारवहीची मागणी केली असता त्यांनी तसे न करता महाड आगाराकडे तक्रार करण्याचे उत्तर दिले.
आरक्षित तिकिटाच्या फरकापोटी आकाश शेवाळे यास सात रुपये परतावा देण्यात आला, तर महाडपासून प्रवास करणार्यांना 9 रुपये परतावा देण्यात आला, अशी माहिती प्राप्त झाली आहे. या मनस्तापामुळे आकाश शेवाळे याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पोलादपूर शहर अध्यक्ष दर्पण दरेकर यांच्या कानावर सदर प्रकार घातला असता दरेकर यांनी याप्रकरणी महाड आगाराच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला. त्यावेळी वाहतूक नियंत्रक शिवाजी जाधव यांनी एकूण प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची ग्वाही दिली आहे. अनेक वर्षांपासून पोलादपूर एसटी स्थानकाच्या परिसरात 100 मीटर्स परिघामध्ये खासगी प्रवासी वाहतुूदारांच्या वाहनांची चलती असून एसटी महामंडळासोबत लागेबांधे दृढ असल्याची चर्चा उघडपणे होत असल्याने एसटी महामंडळाचेच प्रवासी राजरोसपणे या खासगी प्रवासी बससेवेकडे वळवण्याचा प्रकार होत असल्याचे प्रवासीवर्गाचे म्हणणे आहे.