दर 15 ते 20 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय
पुणे : वाढते पेट्रोल व डिझेलचे दर, इतर कर, परमिट, विमा आणि मनुष्यबळाचा वाढीव खर्च आणि एकूणच वाहनांच्या देखभाल खर्चात झालेली वाढ यामुळे खासगी बस सेवेचे दर 15 ते 20 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय बस व्यावसायिकांच्या संघटनांनी घेतला आहे. बस व्यावसायिकांची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या वेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष राजन जुनावणे यांनी सेवेचे नवीन दरपत्रक जाहीर केले.
संस्थेचे अध्यक्ष जनार्दन मुरकुटे, सचिव किरण देसाई, तुषार जगताप, पिंपरी-चिंचवड बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष आण्णा गायकवाड, पुणे डिस्ट्रिक्ट लक्सरी बस असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब खेडेकर या वेळी उपस्थित होते. स्कूल बस, कंपनी बस, सहलीकरिता लागणार्या बस तसेच डेली सर्व्हिस वाहतूक करणार्या बस व्यावसायिकांची या सभेत उपस्थिती होती, अशी माहिती जुनावणे यांनी दिली.
पुणे बस ओनर्स असोसिएशनतर्फे राबविण्यात येणार्या विविध उपक्रमांबद्दल देसाई व जगताप यांनी यावेळी माहिती दिली. विविध जाचक नियमांमध्ये सुधारणा होण्याच्या दृष्टीने संघटनेने अनेकदा संघर्ष करून उत्तम कामगिरी बजावली आहे. स्थानिक पातळीवर बस व्यावसायिक व बस चालकांच्या हितासाठीही संघटना कटाक्षाने काम करते. संघटनेतर्फे राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह नुकताच पाळण्यात आला. तसेच चालकांना वाहतूक नियमांचेप्रशिक्षण देत त्यांचा अपघात विमा उतरविण्यात आला. वाहनचालकांच्या डोळे तपासणीची मोहीम देखील संस्थेने राबवली असून मोतिबिंदू शस्त्रक्रिया व शारीरिक तपासणीची मोहीमही हाती घेण्यात आली आहे, असे देसाई व जगताप यांनी सांगितले.
13 आसनी एसी बसेसचे नवीन दर
पुणे स्थानिक : 10 तास 5 हजार रु.
पुणे-मुंबई : 10 तास 9 हजार रु.
पुणे-महाबळेश्वर : 10 तास 9 हजार रु
चालकभत्ता : 500 रु.