सोलापूर : सोलापुर येथील बार्शी-कुर्डुवाडी मार्गावर खासगी बस उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन लहान मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या झालेल्या अपघातात बसमधील 15 ते 20 जण प्रवासी जखमी असल्याची माहिती आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेडहून मुंबईच्या दिशेने जाताना बार्शीतील वांगरवाडी शिवारात हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.
वांगरवाडी शिवारात रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास (MH04-GP-5151)ही खासगी लक्झरी बस उलटली. बसचा चालक दारुच्या नशेत होता, त्यामुळेच हा अपघात घडला, असा दावा अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांनी केला आहे. या अपघातात मुंबईतील तीन वर्षांची फैज इस्माईल पठाण, लातूरच्या अहमदपूरमधील दीड वर्षांची आर्वी मोहन देवकते आणि नांदेडच्या कंदार तालुक्यातील बारा वर्षांच्या धनश्री ज्ञानेश्वर मुकनर यांचा मृत्यू झाला आहे. तर बसमधील 15 ते 20 जण जखमी असून त्यांना अधिक उपचारासाठी बार्शीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.