खासगी बस 19, 20 सप्टेंबरला संपावर

0

मुंबई । वाहतूक विभागाने मुंबईत लागू केलेल्या निर्बंधांविरोधात मुंबई महानगर क्षेत्रातील सुमारे 33 हजार खासगी बसेस पुढील मंगळवार दि. 19 आणि बुधवार दि. 20 सप्टेंबर असे दोन दिवस संपावर जाणार आहेत. 48 तासांच्या या संपानंतरही मागणी मान्य न झाल्या बेमुदत संपावर जाण्याचा इशारा मुंबई बस मालक संघटनेने दिला आहे. मेट्रोसारख्या विकासकामांमुळे रस्ते अनेक ठिकाणी खोदले असल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीच्या मार्गिका कमी झाल्या आहेत.

काही रस्ते एक दिशा केले आहेत तर काही ठिकाणची वाहतूक अन्य मार्गावर वळवण्यात आली आहे. दुपारच्या सुमारासही अवजड वाहने रस्त्यावर येत असल्याने त्यात भरच पडत आहे. ही वाहतूककोंडी सोडवण्यासाठी वाहतूक विभागाने दक्षिण मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर विविध उपक्रम सुरू केले आहेत.

शासकीय आदेश रद्द करण्याची मागणी
या उपक्रमांतर्गत पूर्वी वाहतूक पोलिसांनी केलेले आदेश रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे नवीन आदेशानुसार दक्षिण मुंबईत अवजड वाहनांना व प्रवासी वाहतूक करणार्‍या सर्व प्रकारच्या खासगी बसेसना सकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. या वाहनांना रात्री एक नंतर सकाळी 7 वाजेपर्यंत दक्षिण मुंबईत जाण्यास परवानगी असेल. तर दक्षिण मुंबई वगळता अन्य भागांत अवजड वाहनांना सकाळी 7 ते 11 आणि सायंकाळी 5 ते 10 या वेळेत प्रवेशावर निर्बंध असतील. या आदेशाला विरोध करण्यासाठीच संपाची हाक दिली आहे.