खासगी शाळा शिक्षक भरतीसाठी चाचणी

0

पुणे । खासगी शाळांमधील शिक्षक भरतीसाठी अनिवार्य करण्यात आलेल्या अभियोग्यता चाचणी परीक्षा मंगळवारपासून (दि. 12) सुरू होत आहे. या ऑनलाइन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात पासवर्ड दिले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियोजित वेळेच्या दीड तास आधी पोहोचणे आवश्यक आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी दिली.

अभियोग्यता चाचणी परीक्षेला प्रवेशपत्र आणि त्याबरोबर छायाचित्र असलेले अधिकृत ओळखपत्र आवश्यक आहे. परीक्षार्थींनी प्रवेशपत्र डाऊनलोड केल्यानंतर त्यावर उमेदवाराचे छायाचित्र असेल, परंतु या प्रवेशपत्रावर दुसरे छायाचित्र लावावे लागणार आहे. उमेदवार परीक्षा केंद्रावर आल्यानंतर त्याला संगणक आणि त्याबरोबर ऑनलाईन परीक्षेसाठी पासवर्ड दिले जाणार आहेत. त्यासाठी परीक्षेच्या दीड तास आधी बोलावण्यात आले आहे, असे डेरे यांनी सांगितले.ही परीक्षा राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत होत आहे. परीक्षा केंद्रावर निरीक्षक म्हणून नेमणे आणि परीक्षार्थ्यांची तपासणी करून त्यांना परीक्षा केंद्रात सोडणे, एवढेच काम परिषदेचे आहे. त्यामुळे काही परीक्षार्थ्यांना पसंतीक्रमानुसार परीक्षा केंद्र न मिळाल्यास त्यास परिषद जबाबदार नाही. ही व्यवस्था माहिती तंत्रज्ञान विभागाची आहे. तरीही परिषदेने परीक्षार्थ्यांना पसंतीक्रमानुसार बैठक व्यवस्था करावी, असे कळविले आहे. त्या पद्धतीने कार्यवाही सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.