खासगी सुरक्षा यंत्रणामुळे चोरीच्या घटनांमध्ये वाढ

0

नवी मुंबई । जुईनगर सेक्टर-11 मधील बँक ऑफ बडोदामध्ये दरोडा पडला असता पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. शहरातल्या खासगी सुरक्षा यंत्रणांवर कोणाचेही वचक नसल्याने सुरक्षा व्यवस्था डगमगली आहे. त्यात पोलीस संख्याबळही कमी असल्याने याचा पुरेपूर फायदा चोरट्यांना झाला आहे. भविष्यात जर अशीच सुरक्षा व्यवस्था राहिली तर प्रती सप्ताह अशा घटना नाकारता येणार नाही. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदर घटना घडली त्याच सानपाडा पोलीस ठाण्याची अवस्था दयनीय असल्याने त्यांच्या सुरक्षतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाला आहे. सानपाडा पोलिस ठाण्याचा कारभार काही वर्षांपासून अनधिकृत आणि अपुर्‍या जागेत सुरू असून या पोलिस ठाण्याला कर्मचारी आणि अधिकारीदेखील इतर पोलीस ठाण्यांच्या मानाने कमीच आहेत. फक्त 70 पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांवर संपूर्ण सानपाडा व जुईनगरच्या काही भागाची कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी आहे. यात 2 पोलिस निरीक्षक, 1 सहाय्यक पोलिस निरीक्षक, 4 पोलिस उपनिरीक्षक आणि उर्वरीत पोलिस कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

काही कर्मचारी रजेवर व इतर कामामध्ये गुंतून जात असल्याने पोलिसांना मनुष्यबळाची कमतरता जाणवते. पोलिस ठाणे क्षेत्रामध्ये पेट्रोलिंगचा भार फक्त दोन कर्मचारी सांभाळतात. सानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुईनगर रेल्वे स्थानकासमोरील सेक्टर-11 मध्ये बँक ऑफ बडोदा, अ‍ॅक्सिस, आणि एसबीआय या तीन मोठ्या बँका आहेत. तसेच पामबीचलगतच्या मोराज रेसिडेन्सी भागातदेखील एसबीआय, अ‍ॅक्सिस, आणि बँक ऑफ बडोदा यांच्या शाखा आहेत. त्याशिवाय मोराज परिसरात मुथ्थुट फायनान्स आणि मुथुट पिनकॉर्पच्या शाखा तसेच पतपेढ्याही आहेत. पाच रुग्णालये आहेत. पामबीच मार्गालगतच्या हायफाय सोसायटी, हॉटेल्स आहेत. सानपाडा रेल्वे स्थानकापलीकडील सायन-पनवेल महामार्ग या हद्दीत येतो. या मार्गावरील अपघातांची संख्या मोठी आहे. सानपाडा गाव, उपनगरी गाड्यांसाठी असलेले लोकलचे कारशेडदेखील या भागात येत असल्याने 70 कर्मचारी, अधिकार्‍यांना इतक्या मोठ्या भागावर 24 तास देखरेख ठेवण्यात अनंत अडचणी येत आहेत.

मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी
या पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचार्‍यांना आहे, त्या स्थितीत व मनुष्यबळामध्ये काम करावे लागत आहे. त्यामुळे बँक ऑफ बडोदावरील दरोड्यानंतर तरी राज्य सरकारला सानपाड्यातील नियोजित जागेत नवीन पोलिस ठाणे उभारण्यास तसेच आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यास जाग येणार आहे का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. तर सानपाडा हा उच्चभ्रू नागरिकांचा भाग असलेला विभाग असल्याने या विभागात पाहिजे तशी सुरक्षा यंत्रणा नाहीये. मोठ्या मोठ्या टॉवरमध्ये करोडोंची घरे आहेत. मात्र रक्षणासाठी असलेल्या सुरक्षा रक्षकांना 8 ते 9 हजार पगार मिळत असल्याने ते काय या घरांची अथवा विभागाची सुरक्षा करणार असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.