शिवसेना नेत्यांचे आ. लांडगेंना प्रसिद्धीपत्रकाद्वारे ‘ओपन चॅलेंज’
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराच्या दिवसेंदिवस उघड होत असलेल्या प्रकारांमुळे पक्षश्रेष्ठीनी या संपूर्ण प्रकरणांची गांभीर्याने दखल घेतली असून, भोसरीचे आमदार व महापालिकेतील इतर नेत्यांची चांगलीच कानउघाडणी केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. भ्रष्टाचार आणि गुंडप्रवृत्तीमुळेच मुख्यमंत्र्यांनी आमदार महेश लांडगे यांना चारहात लांब ठेवले आहे, असा पलटवार शिवसेनेच्यावतीने करण्यात आला. खासदारकीची स्वप्ने पाहणार्यांनी आधी आमदारकी टिकवून दाखवावी, असे थेट आव्हानही शिवसेनेने दिले. तसेच, आ. लांडगे यांची भोसरी व शिरुर लोकसभा मतदारसंघात ‘कॉपी-पेस्ट’ आमदार अशी नवी ओळख निर्माण झाल्याची बोचरी टीकाही शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. शिवसेना शिरूर लोकसभा मतदारसंघाच्यावतीने याबाबत प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले. त्यावर शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अविनाश रहाणे, जिल्हाप्रमुख राम गावडे, महिला आघाडी संपर्कप्रमुख विजया शिंदे, युवासेना जिल्हा अधिकारी गणेश कवडे, महिला आघाडी जिल्हा संघटक श्रद्धा कदम, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माजी गटनेत्या सुलभा उबाळे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी, रवींद्र करंजखेले, शिवाजी वर्पे, अनिल काशिद, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, प्रकाश वाडेकर, सुनील बाणखेले, पोपट शेलार व राजेंद्र पायगुडे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
शिवसेना नेत्यांनी चढविला जोरदार हल्ला!
शिवसेना नेत्यांनी आ. लांडगेंवर जोरदार हल्ला चढविताना नमूद केले, की आ. लांडगे यांच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी भावी मंत्री, भावी खासदार असा सोशल मीडियावर प्रचार केल्याने आमदार लांडगेंची डोकेदुखी वाढली आहे. कारण भोसरी विधानसभा वगळता इतर पाचही तालुक्यात आमदार लांडगेना मानणारा वर्ग अतिशय नगण्य असल्याने त्यांना स्वतःला लोकसभेला उभे राहण्याची अजिबात इच्छा नाही. त्याला कारणेही तशीच आहेत. एकतर मागे झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आंबेगाव, जुन्नर, शिरूर व खेड या ग्रामीण भागातील चारही तालुक्यांत भाजपचे हातावर मोजण्याइतपतही सदस्य निवडून येऊ शकले नाही. एकट्या आंबेगाव व जुन्नर तालुक्यात तर भाजपचा साधा एक ग्रामपंचायत सदस्यदेखील निवडून येऊ शकला नाही. शिरूर तालुक्यात भाजपचा आमदार असूनही जिल्हा परिषदेच्या 7 जागांपैकी शून्य तर पंचायत समितीच्या 14 जागांपैकी केवळ 2 जागा भाजपला मिळाल्या. आंबेगावच्या 5 जिल्हा परिषद व 10 पंचायत समिती तर जुन्नरच्या 7 जिल्हा परिषद व 10 पंचायत समितीमध्ये आमदार लांडगेंना साधा भोपळाही फोडता आला नाही. खेडमध्येदेखील 7 पैकी जिल्हापरिषदेला 2 तर पंचायत समितीच्या 14 पैकी केवळ 1 जागा भाजपला मिळाली. उलटपक्षी चाकण, जुन्नर व शिरुर या तीन नगरपरिषदेवर तसेच खेड व जुन्नर या दोन्ही पंचायत समित्यांवर, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेचीच सत्ता असून, अनेक लहान मोठ्या ग्रामपंचायतींसह मंचर व नारायणगाव या जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायती असलेल्या सुमारे 35-40 हजार मतदार असलेल्या शहरांवरदेखील खासदार आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची निर्विवाद सत्ता आहे. त्यामुळे आ. लांडगेंनी खासदारकीचे स्वप्न पाहू नये, असा टोलाही त्यांना हाणण्यात आला.
एमआयडीसीत दादागिरी करणार्यांना जनता धडा शिकवेल!
शिरुर लोकसभेच्या चारही तालुक्यात भाजप केवळ नावापुरताच आहे. खेडमध्येही साम, दाम, दंड, भेद नीती वापरून पाटीभर अपक्षांचा घेतलेला टेकू भाजपला किती दिवस साथ देईल हे सांगता येत नाही. तर आळंदी नगरपरिषदेत भाजपला झुकते माप दिलेली जनता भाजपच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेने, वाढीव करांच्या बोज्याने पुरती हैराण झाली आहे. केंद्रात व राज्यात सत्ता असूनदेखील आळंदीकरांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळवून देतानाही भाजपच्या नाकीनऊ आले आहेत. शिवसेनेच्या काळात मंजूर झालेला जलशुद्धीकरण प्रकल्प राबविण्यातदेखील भाजप सपशेल अपयशी झाले आहे. मोदी लाटेत आपला निभाव लागणार नाही हे पुरते ओळखून कधीकाळी अजित पवारांचे जवळचे समजले जाणार्या आमदार महेश लांडगे व इतर सहकार्यांनी पालिकेतील रोज सोन्याची अंडी देणारी कोंबडी हातची जाऊ द्यायची नाही या उद्देशाने, गद्दारी करून भाजपात प्रवेश केला. त्यामुळे मोदी लाटेच्या आसर्याने भाजपात प्रवेश केलेले राष्ट्रवादीचे भ्रष्ट नेते सहीसलामत तरंगले. शीतल बागसारखा 80 लाखात होणारा पादचारी पुल वाढीव खर्चाच्या नावाखाली 8 कोटी खर्चुन बांधणारे, वाढदिवसाच्या नावाखाली एमआयडीसीतील उद्योजकांना दादागिरी करणार्यांना जनता धडा शिकवेल, अशी टिप्पणी शिवसेनेने केली आहे.
आ. लांडगेंनी बेजबाबदारपणाचे दर्शऩ घडविले!
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कारभार पारदर्शक व आरशाइतका स्वच्छ आहे असे सांगणार्यांनी खासदार आढळराव पाटील व शिवसेनेने केलेल्या आरोपांना समर्पक उत्तरे देणे शहरातील जनतेला अपेक्षित होते. मात्र त्यावर कुठलेही भाष्य न करता विकासकामांचा शिवसेनेला पोटशूळ उठला, जनता 2019 लोकसभेला बदला घेणार अशा प्रकारची वस्तुस्थितीशी पूर्णपणे विसंगत प्रतिक्रिया देत आमदार लांडगे यांनी आपल्या बेजबाबदारपणाचे दर्शन घडवले आहे. जनतेच्या पैशातून महापालिकेने हाती घेतलेली 425 कोटीची कामे जास्त दराने का दिली गेली याची शहानिशा करून फेरनिविदा काढणे, गैरव्यवहारांची चौकशी होणे अपेक्षित होते, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.