पाचोरा । जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ए.टी.नाना पाटील यांनी पाचोरा रेल्वे स्टेशनला धावती भेट दिली होती. त्या भेटीत त्यांना पाचोरा येथील अप-डाऊन करणारे विद्यार्थी-प्रवाशी यांनी त्यांची भेट घेऊन भुसावळ-देवळाली पॅसेंजरची वेळ पूर्ववत करण्याची विनंती केली. खासदार ए.टी.पाटील यांनी पाचोरा रेल्वे स्टेशनवरुन भुसावळ येथे जबाबदार अधिकार्यांशी बोलून दोन दिवसात कारवाई करण्याचे आदेश दिले होते व दोन दिवसात भुसावळ-देवळाली पॅसेंजरची वेळ पूर्ववत होईल अशी सूचना त्यांनी प्रवाशांना व प्रसारमाध्यमांना दिली होती. परंतू 4 ते 5 दिवस उलटूनदेखील पॅसेंजरची वेळ पूर्ववत झालेली नाही. त्यांच्या या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पाचोरा येथून सोयगाव, गोंदेगाव, भडगाव व एरंडोल तालुक्यातील बरेच प्रवाशी नोकरदार, विद्यार्थी, व्यावसायिक हे जळगाव येथे अपडाऊन करतात. त्यामुळे पूर्ववत पॅसेंजरची वेळ ही भुसावळहून सुटण्याची वेळ 5.20 होेती ती आता 6.00 वाजेची आहे. त्यामुळे ती पाचोरा येथे 7.30 वाजेपर्यंत पोहोचते. पुढे अपडाऊन करणार्या प्रवाशांना सोयीचे वाहन मिळत नाही. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप होतो व प्रवाशांची फरफट होते. याकडे खा.पाटील व रेल्वे प्रशासनाने दखल घ्यावी. तसेच पाचोरा येथे विदर्भ एक्सप्रेसला लवकरच थांबा मिळणार असे खासदार पाटील यांनी मागच्या महिन्यात प्रसारमाध्यमांना सांगितले होते. विदर्भला थांबा मिळणार कधी? सचखंड, महानगरी, अमरावती एक्सप्रेस यांचे काय? असा प्रश्न पाचोरेकरांना पडत आहे.