खासदारांच्या स्वीय सहाय्यकांचे वाहन उलटले

MP’s personal assistant’s vehicle overturned in Bhusawal भुसावळ : रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांचे स्वीय सहाय्यक पंकज राणे यांच्या मालकिची स्कॉर्पिओ वाहनाला भुसावळातील नाहाटा महाविद्यालयाजवळ अपघात घडल्याची घटना बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. या वाहनात सुदैवाने केवळ चालक गणेश झोपे हेच होते मात्र त्यांना कुठलीही ईजा झाली नसल्याचे सांगण्यात आले. अपघाताची माहिती कळताच बाजारपेठ पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

भरधाव वाहने उलटले
चालक गणेश झोपे हे स्कॉर्पिओ (एम.एच.19 बी.एस.1919) घेवून मुक्ताईनगरकडून जळगावकडे निघाले असताना नाहाटा महाविद्यालयाजवळील चौफुलीजवळ वाहन अनियंत्रीत झाल्याने पलटी झाले मात्र सुदैवाने झोपे यांना कुठलीही दुखापत झाली नाही. याचवेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे हे आपल्या वाहनाने निघाले असताना त्यांनीदेखील थांबून अपघाताची चौकशी केली. भाजपाचे शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे यांनीदेखील धाव घेतली तर बाजारपेठ पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. अपघात प्रकरणी गुन्हा दाखल नसल्याचे सूत्रांनी सांगितले.