खासदारीक पेक्षा आमदारकीच बरी!

0

आमदार महेश लांडगे यांना त्यांचे राजकीय गुरू खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांचा सल्ला

पिंपरी-चिंचवड : (बापू जगदाळे) भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पुन्हा जिल्ह्याचे लक्ष वेधून घेत राजकीय वजन वाढवून घेतले आहे. त्यांचा वाढदिवस हा भोसरीपुरताच मर्यादीत न राहता शिरुर लोकसभा मतदारसंघातही साजरा करण्यात आला. मात्र, यानिमित्त शुभेच्छा देताना त्यांचे राजकीय गुरू, खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी खासदारकीपेक्षा आमदारकीच बरी! असा मोलाचा सल्ला भोसरीत दिला. तसेच ‘लांडगे लोकसभेला उभे राहिले तर कदाचित निवडणुही येतील; पण दिल्लीतील राजकीय हवामान महाराष्ट्रारातील नेत्यासाठी लाभदायक नाही. त्यामुळे त्यांनी आमदारकीच्या माध्यमातून मंत्री होऊन राज्याची सेवा करावी. आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम करावे’, असेही सांगितले. यामुळे लोकसभेसाठी तीव्र इच्छुक असलेल्या लांडगेंची कोंडी झाली आहे. आता लोकसभेच्या बाबतीत ते काय निर्णय घेतात, याकडे संपुर्ण शिरुर लोकसभा मतदार संघातील त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

जनतेतून तयार झालेले नेतृत्व
भोसरीतील गावजत्रा मैदानावर भव्यदिव्य स्वरुपात आमदार लांडगे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. या दिवशी जिल्हयातील पदाधिकार्‍यां बरोबरच राज्यातील इतरही भागातून सर्वच क्षेत्रातील व्यक्तिंनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती दर्शवून शुभेच्छा दिल्या. शुभेच्छांमध्ये अनेक नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यावेळी खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी लांडगे यांचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘लांडगे हे जनतेच्या लोकप्रियेतेवर तयार झालेले स्वयंभु नेतृत्व आहे. त्यांच्या पाठीमागे मी मित्र म्हणून सदैव तयार असेन. महापालिका निवडणुकीत लांडगे यांनी अनेकांना नगरसेवक केले; पण काहींना काही कारणामुळे संधी देता आली नाही. म्हणून अशा कार्यकर्त्यांनी नाराज होवू नये. गेलेली संधी भविष्यात देखील मिळु शकते. त्यामुळे लांडगे यांच्या पाठीमाघे भक्कमपणे उभे राहत त्यांना साथ द्यावी. दादांचा विकासकामांचा झंझावात पाहता महेश लांडगेना राजकारणामध्ये अनेक पदे मिळतील यात शंकाच नाही. सध्या लांडगेना भोसरीबरोबरच माझ्या खेड मतदारसंघाचे देखील आमदार म्हणुन प्रतिनिधीत्व करावे लागत आहे. ही खेडवासियासाठी आनंदाची बाब आहे.’

राज्यात मंत्री म्हणून काम करावे
मोहिते-पाटील म्हणाले, ‘लांडगे यांनी दिल्लीत जाण्यापेक्षा राज्यात मंत्री होवून जनतेची सेवा करावी. कारण दिल्लीत महाराष्ट्राच्या नेत्यांना दाबण्याचे काम केले जाते, असे मी नेहमी माझ्या दिल्लीतील मित्रांकडून ऐकत असतो व ते खरेही आहे. लांडगे यांच्या सध्याच्या लोकप्रियेतेतून मीही गेलो आहे. पण पदाबाहेर फेकले गेल्यास आपल्याबरोबरच आपल्या कार्यकर्त्यांची देखील फरफट होत असते. ती होऊ नये म्हणून आपण नेता म्हणून त्यांची देखील काळजी घेणे महत्वाचे असते.’

लांडगे ठाम राहतील?
गुरूंच्या या विधानाचा लांडगे विचार करतील की लोकसभेची निवडणुक लढविण्यावर ठाम राहतील, हे इथून पुढील त्यांच्या हालचालीवरुन मतदारांना निश्‍चितपणे कळेल यात शंका नाही. मोहिते यांचे विधान हे अभ्यासू मानले जाते. कारण मोहिते यांच्या राजकीय प्रवासाचा विचार केला असता ते मुरब्बी राजकारणी समजले जातात. आजही खेड मतदारसंघा बरोबरच पिंपरी चिंचवड, आंबेगाव, जुन्नर परिसरातही त्यांना माऩणारे लाखो कार्यकर्ते आहेत. तसेच मोहिते हे लांडगे यांचे सुरवातीपासुनच हिंतचिंतक व भक्कम साथ देणारे म्हणुन ओळखले जातात. त्यामुळे त्यांनी केलेले विधान आमदार लांडगे यांच्यासाठी चिंतनाचा विषय आहे.