शहरवासीयांसह, भाजप कार्यकर्त्यांतही कुजबूज
पिंपरी-चिंचवड : खासदार असो की आमदार, त्यांना मतदारसंघात जम बसविण्यासाठी कार्यकर्त्यांची भक्कम फळी तयार करावी लागते. त्यासोबतच आर्थिक सबळता आणि पक्षाची जनमाणसातील प्रतिमा उंचविण्यासाठी अटोकाट प्रयत्न करावे लागतात. मात्र याउलट चित्र भाजपचे खासदार अमर साबळे यांच्याबाबतीत पिंपरी-चिंचवड शहरात पहावयास मिळत आहे. पुण्यातील भाजपच्या खासदारांना जो जम बसवता आला आहे, त्या तुलनेत खासदार साबळे यांना शहरात जम बसवण्यात अपयश मिळाले आहे. येत्या 2019 च्या निवडणुकीत त्यांना आपल्या कन्येला पिंपरी विधानसभेतून लढवायचे आहे, मात्र त्यासाठी आतापासून जनसंपर्क, राजकीय रणनीती आखणे गरजेचे असताना, खा. साबळे मात्र फारसे सक्रीय दिसत नाहीत, अशी चर्चा शहरात आणि कार्यकर्त्यांमध्ये ऐकायला मिळते आहे. या उलट भाजपातीलच एक गट खा. साबळेंच्याविरोधात सक्रीय झाला असून, त्यांची निष्क्रियता वरिष्ठपातळीवर पोहोचवित असल्याची माहितीही पक्षसूत्राने दिली आहे.
भ्रष्टाचाराच्या संशयामुळे भाजपची प्रतिमा डागाळली!
मागील आठवड्यातच समाविष्ट गावांच्या विकासासंदर्भातील विषय स्थायी समितीने मंजूर केला होता. या विषयावर खासदारांनी या कामांत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून विरोधकांना पुरेसे बळ देण्याचेच काम केले. यातून पक्षांतर्गत वाद विकोपाला गेल्याचे चित्र भाजपमध्ये पहायला मिळाले. तसेच, सत्ताधारी असलेल्या भाजपसारख्या पक्षाची प्रतिमा डागाळली गेली. शहर पातळीवर भाजपच्या विरोधात वातावरण गढूळ झाले. मात्र या विषयात भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी स्थायीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांना विकासकामांवर टीका करणार्याकडे लक्ष देऊ नका असे सांगून भक्कम पाठिंबा दिला. खासदारांनी पक्षांतर्गत टीका करून स्वतःच्याच पायावर दगड मारून घेतला, असेही कार्यकर्ते बोलत आहेत. शहरपातळीवर पक्षामध्ये दुफळी निर्माण झाली आहे. सत्ताधार्यांमध्ये गटातटाचे राजकारण असते, मात्र त्यावर पक्षश्रेष्ठींनी मर्यादा घालण्यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे. सद्या पक्षामध्ये शहरपातळीवर विविध प्रकारचे गट पडले असून, एक दादांचा, दुसरा भाऊंचा तिसरा खासदारांचा असे गट निर्माण झाल्याने पक्षात दुफळी चांगलीच वाढली आहे. पक्षस्थापनेपासून काम कऱणार्या कार्यकर्त्यांना महापालिकेत सत्ता आल्यानंतर काहीच न मिळाल्याने त्यांच्यामध्ये नाराजी आहे. निष्ठावान कार्यकर्ते चांगल्या पदापासून दूर राहिल्याने त्यांची खदखद कायम आहे. यावेळी खासदारांनी समजुतीची भूमिका घेणे गरजेचे असताना तसे मात्र होत नसल्याचेही दुर्देवाने दिसून येत आहे.
पक्षात निर्माण झाली दुफळी!
खासदार अमर साबळे हे मूळचे संघटनेचे असून, त्यांना पक्ष वाढवता आला नाही. त्यामुळे पक्षाला ऐनवेळी निवडणुकीसाठी उमेदवार आयात करावे लागले. पक्षामध्ये जुन्या-नव्यांचा वाद पुढे आला. या वादामध्ये खासदारांनी सामंजस्याची भूमिका घेऊन संघटनेला बळकटी देणे गरजेचे होते, मात्र याउलट पक्षामध्ये दुफळी निर्माण झाली. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी झाली. याचा परिणाम पक्षाच्या कामकाजावर आज होताना दिसून येत आहे. महापालिकेत स्वीकृत सदस्यांच्या निवडीदरम्यान स्वीकृत सदस्य माऊली थोरात, मोरेश्वर शेडगे यांच्यासाठी पक्षातील इतर कार्यकर्त्यांचा विचार केला नाही. त्यामुळे पक्षातील वाद विकोपाला गेला. आपल्या माणसांना स्वीकृत सदस्यत्व मिळण्यासाठी खासदारांनी मुख्यमंत्र्यापर्यंत फिल्डिंग लावली. स्वीकृत सदस्यत्वाच्या वेळी निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय मिळणे गरजेचे असताना त्यांना न्याय मिळाला नाही.
पिंपरीसाठी खासदारांचा पुन्हा रिकामा हात!
खासदार अमर साबळे यांनी 2009 मध्ये पिंपरी मतदारसंघात निवडणूक लढवली होती, मात्र त्यावेळी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर पक्षाने त्यांना खासदार केले. मात्र त्यांनी पद मिळाल्यानंतरही पिंपरीकरांसाठी काहीच केले नाही. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्या कन्येस निवडून आणण्यासाठी आतापासून त्यांचे प्रयत्न चालू आहेत. मात्र त्यांच्या पक्षातील आजवरच्या कारकिर्दीमुळे त्यांना पिंपरी मतदारसंघात कितपत यश मिळेल यामध्ये शंका आहे.