खासदार आढळराव असतील राष्ट्रवादीचे लोकसभा उमेदवार?

0

पिंपरी-चिंचवड (बापू जगदाळे) : अद्यापही देशभर मोदी लाट कायम असल्याचे वेगवेगळ्या निवडणुकीतील विजयामुळे दिसून आले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये एकला चलोच्या भूमिकेला बळकटी मिळत आहे. दोन वर्षानंतर होणार्‍या लोकसभेच्या निवडणुकीमध्येदेखील कोणत्याही पक्षाची युती न करता निवडणुका लढवायच्या यासाठी पक्षाने आत्तापासूनच जोरदार तयारी सुरु केली आहे. त्या पार्श्वभूमीवरच शिरुर लोकसभा मतदारसंघातून भोसरीचे आमदार व भाजपचे सहयोगी सदस्य महेश लांडगे यांना लोकसभेच्या आखाड्यात आढळराव यांच्याविरोधात उतरवण्याची तयारी केली आहे. मतदारसंघातील शिवसेनेची आता कमी झालेली ताकद पाहता व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळीचे नेहमीच पक्ष प्रवेशाचे येणारे आवतण बघता शिरुर लोकसभेची पुढील निवडणूक शिवसेनेचे खासदार आढळराव-पाटील राष्ट्रवादीकडून लढणार की काय? अशी परस्थिती मतदारसंघात दिसून येत आहे.

आ. दिलीप वळसे-खा. आढळरावांची जवळीक वाढली
शिरुर मतदारसंघात काही महिन्यांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेची केविलवाणी अवस्था झाली. ही अवस्था पाहता आतापर्यंतच्या निवडणुकीत युतीमुळे दादा ठरलेले खासदार आढळराव यांना पुढील निवडणूक अवघड असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आढळराव यांच्यापुढे राष्ट्रवादीचा पर्याय खुला असल्याचे आवतण खुद्द राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीच दिले असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांची भूमिका महत्वाची ठरत आहे. त्यामुळे पुढील लोकसभेची निवडणूक पाटील राष्ट्रवादीकडून लढतील का या बाबत शिरुर मतदारसंघात तर्कवितर्क सुरु आहेत. त्यामुळेच दादानिष्ठ मतदारसंघातील कार्यकर्ते व राष्ट्रवादीचे सच्चे कार्यकर्ते यांच्यात सध्या कधी नाही ती जवळीक वाढली आहे. ही जवळीक पुढील समिकरणे जुळवण्यासाठीच सुरु असल्याचे भोसरीतील एका राष्ट्रवादीच्या नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

कार्यकर्त्यांच्या बंडखोरीमुळे ताकद घटली
आढळरावांनी खासदारकीची हॅट्ट्रिक चढत्या मताधिक्याने नोंदविली आहे. पूर्वाश्रमीच्या खेड लोकसभा मतदारसंघातून 2004 च्या निवडणुकीत ते प्रथम खासदार झाले होते. त्यानंतर 2009 च्या मतदारसंघ्याच्या पुनर्रचनेत शिरुर मतदारसंघातून दोनवेळेस शिवसेनेचे नेतृत्व केले आहे. या मतदारसंघात भोसरी, हडपसर, खेड-आळंदी, शिरुर, आंबेगाव व जुन्नर विधानसभा मतदारसंघाचा समावेश होत आहे. यात भोसरी, हडपसर व शिरुर मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तर खेड-आळंदीमध्ये शिवसेनेचा जुन्नरमध्ये राज्यात मनसेचा एकमेव आमदार असून, तोदेखील भाजपच्या वाटेवर आहे. तर आंबेगावमध्ये राष्ट्रवादीचा आमदार आहे. मागील 2009 च्या विधानसभेच्या वेळी हडपसर सोडले तर सर्वच ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार होते. वैयक्तिक जनसंपर्क व भाजप शिवसेनेची असलेली युती व तूल्यबळ नसलेली काँग्रेस यामुळे आढळरावांनी तीनही निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. पण 2014 पासून भाजपची वाढलेली ताकद व त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी केलेली बंडखोरी व भाजप प्रवेश यामुळे आढळरावांची ताकद कमी झाली असल्याचे दिसत आहे.

आ. लांडगेंचा झंजावात रोखण्याचे आव्हान
भोसरीतील पै. महेश लांडगे या तरुण आमदारानी शिरुर मतदारसंघात वाढवलेला जनसंपर्क व त्यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहता, भाजपनेदेखील त्यांना जवळ केले आहे. त्या जोरावरच आळंदी नगरपरिषद व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीतदेखील त्यांनी दाखवलेला करिष्मा पाहता, अनेक कार्यकर्त्यांची फळी त्यांच्या जवळ येत आहे. ही आढळरावांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. आ. लांडगे यांच्याकडून सध्या मतदारसंघात लक्ष 2019 लोकसभाची मोठी ब्रॅण्डिंग केली जात असून, त्याला पालकमंत्री गिरीष बापट यांच्याबरोबरच पक्षाचेदेखील मोठे पाठबळ मिळत आहे. यामागे भाजपचा मोठा डाव आहे. तो मात्र सध्यातरी गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे आढळरावांची अर्धी ताकत युती होणार नसल्यामुळे कमी होणार असून, महत्वाच्या भोसरी व हडपसर मतदारसंघातूनच त्यांची पिछेहाट होत आहे.

खा. आढळरावांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
महापालिका निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचा एकही नगरसेवक निवडून आणण्यात खा. आढळरावांना यश आले नाही. त्यामुळे येथील शिवसेनेची अवस्था पूर्वीसारखी राहिली नसल्याचे दिसत आहे. तर या मतदारसंघात राष्ट्रवादीकडेही प्रभावी उमेदवाराची वाणवाच असल्यामुळे त्यांनी आता बदलत्या राजकीय समिकरणाचा फायदा घेत शिवसेनेचे खासदार आढळराव यांना गळाला लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आपली खासदारकी वाचविण्यासाठी आढळराव शिवसेनेतूनच प्रयत्न करणार की राष्ट्रवादीचे घड्याळ हाताला बांधणार हे त्यांच्या येथून पुढील राजकीय हालचालीवरुन स्पष्ट होईल. यामुळे मात्र शहरातील आ. लांडगे विरोधक हे खा. आढळरावांना पुरेपूर मदत करणार हे मात्र नक्की.