खासदार ए.टी. पाटील यांना शोधा आणि एक हजार रूपयांचे पारितोषिक मिळवा!

0

जळगाव। खासदार ए.टी. पाटील हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी मतदारसंघातून गायब होते. आता मात्र त्यांना जनतेचा पुळका आला असून ते केंद्रीय मंत्र्यांना निवेदन देत असल्याचा आरोप करत काँग्रेसचे महानगराध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी सोशल मीडियातून त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. एवढेच नव्हे तर चक्का खासदार ए.टी. पाटील यांना शोधा आणि एक हजार रूपये मिळवा असे जाहीर आवाहनदेखील त्यांनी आपल्या ‘जळगाव फर्स्ट’ या सामजिक संस्थेच्या माध्यमातून दिले आहे. दरम्यान सोशल मीडियात राजकीय वादाला फोडणी मिळाल्याने याची एकच चर्चा सुरू झाली आहे.

ही जळगावकरांची फसवणूक : डॉ. राधेश्याम चौधरी यात पुढे म्हणतात की, खासदार ए.टी. पाटील हे कधीही मतदारसंघात दिसत नाहीत. यामुळे कुणी त्यांना शोधून आणले तर त्याला एक हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे बक्षीस खासदारांच्याचहस्ते प्रदान करण्याचा मानस व्यक्त करत त्यांनी जोरदार टोला लगावला आहे. महामार्ग दुरुस्तीसाठी 10 कोटी मिळालेहे तुणतूणे भाजपचे पुढारी दोन महिने झाले वाजवत आहेत. अजून काम सुरु नाही. हि जळगावकरांची फासवणूक आहे. जळगाव शहरात अमृत योजनेच्या 191 कोटी रुपये कामात उशीर होतोय. 25 कोटींचा निधी खर्च करायला समिती दिली आहे. भाजपचा हा खटाटोप जळगाव मनपात शत प्रती शत भाजपसाठी सुरु असून नागरिकांना छळून व मृत्यूच्या तोंडी देवून भाजप नेते काय मिळवित आहे ? असा खडा सवाल यांनी केला आहे. यासंदर्भात खासदार ए.टी.पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला असता ते लोकसभेच्या कामकाजात रात्री उशिरापर्यंत व्यस्त होते.

आधी ‘जळगाव फर्स्ट’चा पुढाकार !
डॉ. राधेश्याम चौधरी यांना सोशल माध्यमात टाकलेल्या पोस्टमध्ये नमुद केले आहे की, भाजपचे नेते फक्त निवेदन देण्यामध्ये पटाईत आहेत. मतदारसंघात कधीही न दिसणारे खासदार ए.टी. पाटील हे मंगळवारी केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांना निवेदन देतांना दिसले. याआधी राजूमामा भोळे आणि चंदूभाई पटेल या आमदारद्वयींनीही याच पध्दतीने निवेदन दिले होते. यानंतर एकनाथराव खडसे यांनी मुलाखत दिली तर रक्षाताई खडसेंनी मुंबईत बैठक घेतली तरी याचे पुढे काय झाले हे कळले नाही. वास्तविक पाहता या प्रकरणी ‘जळगाव फर्स्ट’ला ना. गडकरी यांनी पोचपावती दिली होती असे डॉ. चौधरी यांनी नमुद केले आहे.

मनपातील सत्ताधार्‍यांवरही टिकास्त्र
डॉ. राधेश्याम चौधरी यांनी महापालिकेतील सत्ताधार्‍यांवरही जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले की, स्मार्ट सिटीमध्ये जळगावच्या समावेशची संधी हुकल्यानंतर अमृत योजनेत शहराचा समावेश झाला. या माध्यमातून शहरात भूमिगत गटारी, जलवाहिन्या आणि रस्ते बांधणीसारखी कामे होण्याची अपेक्षा निर्माण झाली. मात्र यासाठी अर्ज केलेले ठेकेदार निकष पूर्ण करत नसल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले असून या योजनेवर प्रश्‍नचिन्ह लागले आहे. राज्य शासनाकडून मिळणार असणार्‍या 25 कोटींबाबतही राजकारण सुरू झाले असल्याचा आरोप त्यांनी केला. शहराच्या विकासात राजकारण न आणता समग्र विकास करण्याचे आवाहनदेखील डॉ. चौधरी यांनी केले आहे.