खासदार कपिल पाटील यांनी टोरेंट पॉवर कंपनीला खडसावले

0

भिवंडी । भिवंडी शहरासह तालुक्यातील ग्रामस्थांचा टोरेंट पॉवरच्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप आहेत. आतापर्यंत ग्रामस्थांनी संयम बाळगला असून, एकाही गावाने 500 ग्रामस्थांसह एकत्र येत कंपनीच्या अधिकार्‍यांना मारहाण केलेली नाही. कंपनीकडून दादागिरी केली जात असल्याच्या तक्रारी असून, कंपनीला ब्रिटीशांच्या राजवटीची उपमा दिली जात आहे. कंपनीने कार्यपद्धती न सुधारल्यास भविष्यात कंपनी अडचणीत येईल, अशा शब्दांत भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी टोरेंट कंपनीला खडसावले. टोरेंट पॉवर कंपनीसंदर्भातील तक्रारी व सुचनांसाठी शनिवारी विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीला ज्येष्ठ नेते आर.सी.पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे, माजी सभापती गोकूळ नाईक, टोरेंट कंपनीचे उपाध्यक्ष प्रकाश सजनानी, महाव्यवस्थापक दीपक शुक्ला आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पोलिसांच्या बळावर दादागिरी
तालुक्यातील सरपंचांनी कंपनीच्या कार्यपद्धतीवर टीकस्त्र सोडले. कंपनीकडून पोलिसांच्या बळावर दादागिरी केली जाते. तसेच अवास्तव रकमेची बिले आकारली जात असल्याचा आरोप केला. सरपंचांबरोबरच काही निवडक ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून पाटील यांनी कंपनीला कार्यपद्धती सुधारण्याचा इशारा दिला. ब्रिटीशांसारखे काम कंपनीकडून केली जात असल्याची टीका ग्रामस्थांकडून होत आहे. त्यावरुन कंपनीने धडा घ्यायला हवा, असे मत खासदार पाटील यांनी व्यक्त केले. भिवंडीत टोरेंट कंपनी आल्यानंतर वीजपुरवठ्यात निश्‍चितच सुधारणा झाली आहे. यापूर्वीपेक्षा वीज उपलब्ध असते. मात्र, मीटर फास्टच्या तक्रारी आहेत. त्यामुळे प्रायोगिक तत्वावर कंपनीचा मीटर व अन्य कंपनीने प्रमाणित केलेला मीटर एकाच ठिकाणी बसवावेत. त्यानंतर आपल्याला निष्कर्ष काढता येईल, अशी सुचना पाटील यांनी केली. वीजचोरीबाबत पंचनामे करताना कंपनीकडून एकतर्फी केले जात असल्याचा आरोप सरपंचांकडून करण्यात आला. त्यावेळी पोलिसांच्या उपस्थितीशिवाय कंपनीचा पंचनामा ग्राह्य धरणार नाही, असे यांनी स्पष्ट केले.