पुणे : खडकवासला धरण व एनडीएसाठी संपादित केलेल्या न्यू कोपरे गावाच्या जागेच्या मोबदल्यात तेथील रहिवाशांना पुनर्वसनासाठी शासनाने दिलेली जागा न देता परस्पर खासदार काकडे यांनी बनावट कागदपत्राद्वारे स्वतःच्या नावावर केल्याचा गुन्हा पुण्याच्या वारजे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दिलीप हरिभाऊ मोरे यांनी ही तक्रार दिली असून त्यामध्ये काकडे कन्स्ट्रक्शन कंपनी तसेच या कंपनीचे संचालक बांधकाम व्यावसायिक व खासदार संजय काकडे यांच्यासह त्यांचे बंधू सूर्यकांत काकडे यांच्यावर वारजे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कागदपत्रात खाडाखोड, 17 एकर जमीन बळकावली
या प्रकरणात गावकर्यांची मोठी फसवणूक झाल्याचे सकृतदर्शनी दिसत असल्याने संबंधितांविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास करणे आवश्यक असल्याने संबंधितांवर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ई. टी. गोटे यांच्या न्यायालयाने दिले होते. त्यानुसार गुन्हा दाखल करून घेण्यात आला आहे. न्यू कोपरे ग्रामस्थांनी 14 एकर जमीन सूर्यकांत काकडे यांना विकसनासाठी दिली होती. मात्र, कागदपत्रात खाडाखोड करून एकूण 38 एकर जमीन घेण्यात आली. त्यातील सात एकर जमीन महापालिकेला ऍमिनीटी स्पेस म्हणून देण्यात आली. ऊर्वरीत 17 एकर गावकर्यांच्या मालकीची जमीन बेकायदेशीरपणे बळकावण्यात आल्याचे गावकर्यांचे म्हणणे आहे. यातील काही भागावर बांधकाम करण्यात आले तर काही भागातील प्लॉट विकण्यात आले आहेत.
माझ्यावरील आरोप निराधार : काकडे
हे सर्व आरोप हे खोटे असल्याचे काकडे यांनी म्हटले आहे. खासदार काकडे म्हणाले, त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे ठोस पुरावे नाहीत. जमीन विकसनाचा मूळ करार आणि इतर संबंधित सर्व कागदपत्रे पोलीस व न्यायालयाला सादर करणार आहोत. तसेच, पोलीस चौकशीला पूर्ण सहकार्य करणार आहोत. आरोपकर्त्यांच्या म्हणण्यात तथ्य नसल्याने त्यांचा कोठेच टिकाव लागला नाही. आता त्यांनी न्यायालयात दाद मागितली तेव्हा न्यायालयाने आम्हाला आमची बाजू मांडण्यासंदर्भात संधी दिली नाही. तसेच, यासंदर्भात नोटीस दिली नाही. त्यावेळीच आमची बाजू मांडण्याची संधी न्यायालयाने दिली असती तर, गुन्हादेखील दाखल झाला नसता. कारण, राज्य शासनाकडून मिळालेल्या 15.45 हेक्टर जमिनीच्या विकासासंदर्भात झालेल्या मूळ कराराप्रमाणेच तेथील बांधकाम झाले आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची खाडाखोड झाली नाही. दिलीप मोरे यांनी केलेले आरोप निराधार आहेत, असे खासदार काकडे म्हणाले.