उस्मानाबाद : एअर इंडियाच्या कर्मचार्याला चपलेने मारहाण केल्यानंतर चर्चेत गेलेले शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी संसद अधिवेशनाला हजेरी लावण्यासाठी रस्त्याने प्रवास करण्याचा पर्याय निवडला आहे. मारहाणीमुळे त्यांना एअर इंडियासहित इतर विमान कंपन्यांनी काळ्या यादीत टाकले असून, त्यांच्या विमान प्रवासावर बंदी आणली आहे. खा. गायकवाड कारने दिल्लीमध्ये पोहोचले असून, लोकसभेत मात्र हजेरी लावली नाही. तसेच गुरुवारीदेखील लोकसभेत हजर राहायचे की नाही याबाबत पक्षश्रेष्ठींकडून आदेश आल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल, असेही सूत्रांकडून समजले आहे.
रेल्वेतही जागा आरक्षित, परंतु कारने प्रवास
रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या हैदराबाद ते दिल्ली एआय-551 विमानाचे तिकीट बूक केले होते, मात्र ते रद्द करण्यात आले. यानंतर गायकवाड यांनी एअर इंडियाच्या एआय-806 या बुधवारी सकाळी 8 वाजता सुटणार्या विमानाचे तिकीट बूक केले होते. मात्र, कंपनीने ते तिकीटदेखील रद्द केले. विमान प्रवास शक्य नसल्याने रवींद्र गायकवाड मुंबई ते दिल्ली रेल्वेने प्रवास करण्याची शक्यता होती. एका वृत्तवाहिनीने त्यांच्या नावे राजधानी एक्स्प्रेसच्या कोचमध्ये जागाही आरक्षित असल्याचे दाखवले होते. मुंबई सेंट्र्लहून ही एक्स्प्रेस निघणार होती. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खा. गायकवाड यांनी कारने प्रवास सुरू केला होता. एअर इंडियासह सात विमान कंपन्यांनी रवींद्र गायकवाड यांच्या विमान प्रवासावर बंदी घातली आहे. खा. गायकवाड यांना पुन्हा विमानाने प्रवास करू देण्याची मागणी करणारा विशेषाधिकार प्रस्ताव शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी लोकसभाध्यक्षांकडे दिला. मात्र सरकारने ‘कोणाचेही गैरवर्तन हे विशेषाधिकाराखाली येत नाही’ अशी कठोर भूमिका घेतली आहे.
खा. गायकवाडांनी खेद व्यक्त करण्यासाठी दबाव
खासदारावर बंदी घातल्यामुळे सभागृहाच्या हक्कांचा भंग होतो त्यामुळे हा प्रश्न विशेषाधिकार समितीकडे पाठवावा, अशी विनंती शिवसेनेच्या सदस्यांनी मंगळवारी लोकसभाध्यक्षांकडे केली. मात्र दोन पानांच्या विशेषाधिकार प्रस्तावावर सरकार आणि शिवसेनेचे नेते यांच्यात तोडगा निघेल, म्हणून अध्यक्षांनी तो प्रलंबित ठेवला आहे. गायकवाड यांच्या वर्तनाने सगळ्या राजकीय वर्गाला खाली मान घालावी लागली असून, कॅमेर्यांसमोर त्यांनी जो संताप व्यक्त केला त्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त करावा, असे भाजप नेतृत्वाने कळवले आहे. संसदीय कामकाज राज्यमंत्री मुक्तार अब्बास नक्वी म्हणाले की, विशेषाधिकाराचाभंग कोणाच्याही गैरवर्तनाने होत नाही. नक्वी यांनी सेनेच्या खासदाराचा उल्लेख केला नाही. परंतु सरकारला या प्रकरणात नेमके काय वाटते हे स्पष्ट झाले आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष चौकशी तुकडीकडून येणार्या अहवालाची सरकारला प्रतीक्षा आहे. या तुकडीने 15 साक्षीदारांचे म्हणणे नोंदवून घेतले आहे. लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनाही या प्रश्नावर निर्णय घेण्यास दिल्ली पोलिसांकडून या हंगामी अहवालाची माहिती दिली जाईल.