नवापूर । नंदुरबार जिल्ह्यात कॉग्रेसला पराभुत करण्यासाठी राज्यातील भाजपच्या मातब्बर नेत्यांनी प्रयत्न केले. मात्र भाजप सरकार केवळ घोषणाबाजी करण्यात अट्टल असल्याचे ओळखून नंदुरबारच्या जनतेने त्यांना नाकारले आहे. केंद्रात सलग नऊवेळा निवडुन माणिकराव गावीत यांनी नंदूरबारची एक ओळख बनवली आहे. आता मात्र खासदार डॉ.हिना गावीत यांनी विकासाचा भुलधापा देण्याचे व मोदींची नक्कल करण्यात साडेतीन वर्ष घालवल्याचे आरोप आमदार चंद्रकांत रघूवंशी यांनी केले. काँग्रेसतर्फे नवापूर येथे आभार सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते. कॉग्रेसचे नगराध्यक्ष, नगरसेवकांना निवडून दिल्याबद्दल जनतेचे आभार मानण्यासाठी आभार सभेचे आयोजन करण्यात आले होते.
विजयी, पराभूत यांचा सत्कार
यावेळी नगराध्यक्षा हेमलता पाटील, माजी खासदार माणिकराव गावीत, तालुका अध्यक्ष भरत गावीत, आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरिष नाईक, गटनेते गिरीश गावीत, अजित नाईक, अजय पाटील, कृणाल वसावे, नगरसेवक आरीफ बलेसरिया, रेणुका गावीत, हारुण खाटीक, आशीष मावची, दर्शन पाटील, सारीका पाटील, मंगला सैन, बबीता वसावे, महिमा गावीत, विश्वास बडोगे, मंजु गावीत, सीमा पाटील, मेघा जाधव, बंटी चंदलानी, गुलाम होरा, विनय गावीत आदी उपस्थित होते. कार्यक्रमात निवडणुकीत पराभूत झालेले बंटी चंदलानी, सीमा पाटील, मेघा जाधव, गुलाम होरा यांचाही सत्कार करण्यात आला.
आश्वासनाची पूर्तता
नगराध्यक्षा हेमलता पाटील यांनी जनतेचा विश्वासला कधीच तडा जाऊ देणार आहे असे सांगत जनतेला दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करण्यासाठी सदैव तत्पर राहिल असे आश्वासन त्यांनी दिले. तालुकाध्यक्ष भरत गावीत यांनी मतदारांचे आभार मानले. यावेळी शिरीष नाईक यांनी नवापूर तालुक्याचा विकास जेष्ठ नेत्यांमुळे झाला आहे. विकासाला गती देण्याचे काम त्यांनी केले आहे, निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात आम्हाला यश आले असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिलीप गावीत, आर.सी.गावीत यांनी तर आभार गटनेते गिरीश गावीत यांनी मानले.