खासदार बारणेंनी भाजपविरोधात निवडणूक लढवून दाखवावी

0

पिंपरी-चिंचवड : खासदार श्रीरंग बारणे हे प्रसिद्धीलोलूप आहेत. कोणत्याही मुद्याचे राजकारण करायचे, मंत्र्यांसोबत फोटो काढून पत्रकबाजी करायची आणि प्रसिद्धी मिळवायची, याच एकमेव कामात बारणे यांनी आपल्या खासदारपदाचा कालावधी वाया घालवला. सरकारने अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी जाहीर केलेली प्रारूप नियमावली सुटसुटीत असताना, ती जाचक असल्याचे सांगून ते शहरातील नागरिकांना घाबरवण्याचे काम करत आहेत. एकीकडे भाजपचे उंबरे झिजवायचे आणि दुसरीकडे आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा. त्यांचा हा उद्देश भाजप कदापि सफल होऊ देणार नाही. हिंमत असेल तर, त्यांनी भाजपविरोधात निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केले आहे.

आरोपाला जोरदार प्रत्युत्तर
घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने थेरगाव येथे घेतलेल्या मेळाव्यात खासदार श्रीरंग बारणे यांनी अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी जाहीर झालेली प्रारूप नियमावली जाचक असल्याचा आरोप केला. त्यांच्या आरोपाला सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ पवार म्हणाले, सरकारने राज्यभरातील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, हा विषय उच्च न्यायालयात असल्यामुळे तो सोडविताना प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकावे लागत आहे. नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठीच सरकारने अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याची प्रारूप नियमावली जाहीर करून त्यावर हरकती व सूचना मागविल्या आहेत. असे असताना खासदार बारणे हे या प्रारूप नियमावलीवरून नागरिकांना घाबरवण्याचे काम करत आहेत, असे पवार म्हणाले.

अकलेचे तारे तोडले
प्रारूप नियमावली जाचक असल्याचे सांगून खासदार बारणे यांनी स्वत:च्याच अकलेचे तारे तोडले आहेत. शहरात आल्यानंतर सरकारवर टीका करायची, नंतर दिल्ली आणि मुंबईत मंत्र्यांसोबत चर्चा करताना फोटो काढायचे, त्यातून प्रसिद्धी मिळवायची. एवढे एकच काम त्यांना जमले आहे. त्यांनी काही ठोस आणि रचनात्मक काम केले असते, तर मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदारांचे भले झाले असते. मात्र, दुर्दैवाने तसे झाले नाही, असेही एकनाथ पवार यांनी सांगितले.

भाजपच्या मदतीचा विसर
भाजपमुळे ते खासदार झाले, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, खासदार झाल्यानंतर त्यांना भाजपच्या मदतीचा विसर पडला आहे. एकीकडे भाजपचे उंबरे झिजवायचे आणि दुसरीकडे नागरिकांची दिशाभूल करून आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची, असा प्रकार सुरू आहे. अनधिकृत बांधकामांचा प्रश्न आता कायमचा सुटण्याच्या मार्गावर असताना त्यांनी नागरिकांना कितीही घाबरवण्याचे काम केले तरी त्याला येथील नागरिक बळी पडणार नाहीत. हिंमत असेल, तर त्यांनी भाजपच्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी. त्यांची जागा त्यांना दाखवून देऊ, असे आव्हान पवार यांनी दिले आहे.