खासदार रक्षा खडसेंचे कार्य गौरवास्पद ; प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात उमटवा कार्याचा ठसा

0

राज्यमंत्री दिलीप कांबळे ; भुसावळात आयोजित पाच दिवसीय बहिणाबाई महोत्सवाचा समारोप

भुसावळ- खासदार रक्षा खडसे यांचे कार्य गौरवास्पद असून बचत गटातील महिलांना रोजगार मिळण्याच्या उद्देशाने आयोजित महोत्सवाची संकल्पना निश्‍चितच चांगली असून या माध्यमातून बचत गटांना रोजगारदेखील मिळाला आहे शिवाय या महोत्सवात बहिणाबाई पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या पुरस्कारार्थींचे आपण मनापासून अभिनंदन करतो, प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात चमकदार कामगिरी करून ठसा उमटवा, असे मत राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी व्यक्त करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात दिलेल्या स्वच्छता मुलमंत्राचे महोत्सवात व महोत्सवाच्या परीसरात काटेकोरपणे पालन होत असल्याचे कौतुक केले. मुक्ताईनगरच्या गुरूनाथ फाऊंडेशनतर्फे आयोजित पाच दिवसीय महोत्सवाचा बुधवारी समारोप झाला. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून राज्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी विविध क्षेत्रात कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणार्‍यांचा बहिणाबाई पुरस्काराने सन्मान करण्यात आला तसेच पाच दिवसीय महोत्सवात वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरण करणार्‍यांनाही गौरवण्यात आले. दरम्यान, राज्यमंत्र्यांच्या दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर आंदोलनाचा इशारा देणार्‍या भारीपा पदाधिकार्‍यांनी शहर पोलिसांनी दिवसभर स्थानबद्ध केले.

पाच दिवसीय महोत्सवात लाखोंची उलाढाल -खासदार
बचत गटांना रोजगार व मार्केट मिळण्याच्या दृष्टीने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले व प्रत्येक बचत गटाला यातून मोठा आर्थिक लाभ झाल्याचे खासदार रक्षा खडसे म्हणाल्या.

होम मिनीस्टर कार्यक्रमास दाद
बुधवार, 11 रोजी ज्येष्ठांना मार्गदर्शन तसेच सायंकाळी व्याख्यान व महिलांसाठी सचिन सावंत यांनी घेतलेल्या होम मिनीस्टर कार्यक्रमास शहरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहर व जिल्ह्यातील विविध पदाधिकार्‍यांची नावे, आमदारांच्या वाहनांचा क्रमांक तसेच गेम शो पद्धत्तीने महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.

भारीपा कार्यकर्ते दिवसभर स्थानबद्ध
राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी भारीपाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप केल्याने भारीपाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी कांबळे यांना जिल्ह्यात पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्‍वभूमीवर शहर पोलिसांनी भारीपा जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, जिल्हा महासचिव दिनेश ईखारे, भुसावळ शहराध्यक्ष गणेश इंगळे यांना शहर पोलिस ठाण्यात दिवसभर स्थानबद्ध केले होते. रात्री उशिरा राज्यमंत्री गेल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

बहिणाबाई पुरस्काराने यांचा सन्मान
कार्यक्रमात भारती शरद पाटील, ज्योती अरुण नंदर्षी, सुधा पुरूषोत्तम काबरा, गौरी मंगलसिंग बुरकुले, सुचेता वैष्णवी अग्निहोत्री, माया दिलीप धुप्पड, डॉ.आशालता अशोक महाजन, डॉ.भाग्यश्री शैलेंद्र भंगाळे, कल्पना दिलीप पाटील, मेवास सिद्धीकी, डॉ.शुभांगी दिनेश राठी यांचा बहिणाबाई पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

उत्कृष्ट सादरीकरण करणार्‍यांचाही सन्मान
पाच दिवसीय महोत्सवात उत्कृष्ट सादरीकरण करणार्‍या भाग्यश्री भंगाळे (लावणी), डॉ.आशुतोष व डॉ.सुजाता कोळकर (माऊथ ऑर्गन), प्रा.डॉ.रघुनाथ कश्यप (गझल), पवन टाक व ग्रुप (नृत्य) , संगीत नृत्य कला निकेतन (प्रार्थना), शंकर पेटारे (बासरी वादन) यांच्यासह विविध स्पर्धकांचा तसेच फॅन्सी ड्रेस स्पर्धेतील स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला.

यांची होती व्यासपीठावर उपस्थिती
माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार हरीभाऊ जावळे, आमदार गुरूमुख जगवाणी, जळगाव महापौर सीमा भोळे, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंबनायक रमेश विठू पाटील, उद्योजक मनोज बियाणी, दीपनगरचे मुख्य अभियंता पंकज सपाटे, डीआरडीएचे सहाय्यक संचालक शिरसाठ, पाणलोट विभागाचे भोकरे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, संदीप पाटील यांनी केले.