रावेर मतदारसंघात लेवा समाजाच्या उमेदवाराचाच बोलबाला
भुसावळ (गणेश वाघ)- रावेर लोकसभेसाठी विद्यमान खासदार रक्षा खडसे यांचा पत्ता कापला जाणार असल्याच्या गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अफवांना गुरुवारी सायंकाळी अखेर पूर्णविराम मिळाला. भाजपाच्या पहिल्या यादीत खडसेंना तिकीट जाहीर झाल्याने रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडे जागा असून काँग्रेस-राष्ट्रवादीत नेमकी जागा कुणाला याचे त्रांगडे सुटलेले नसताना विरोधकांना मात्र खडसेंच्या उमेदवारीमुळे तगडे आव्हान उभे राहिले आहे. अडीच वर्षांपासून मंत्री मंडळाबाहेर असलेल्या एकनाथराव खडसे यांनी अनेकदा पक्षावर बोचरी टिका केली होती तर अलिकडेच अंबानीच्या बंगल्यावर आणलेल्या जप्तीचा गौप्यस्फोट केल्यानंतर रक्षा खडसे यांना तिकीट मिळणार की नाही? हा संभ्रम असतानाच त्यांना तिकीट जाहीर झाल्याने सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
लेवा समाजाच्या उमेदवाराचाच बोलबाला
आधी बुलढाणा, नंतर जळगाव व हल्ली रावेर लोकसभा म्हणून ओळख असलेल्या मतदारसंघातून लेवा पाटीदार समाजाचा एकमेव खासदार निवडून येत असल्याचा इतिहास आहे. शिवराम रंगो राणे, वाय.एस. महाजन, वाय.एम.बोरोले, गुणवंतराव सरोदे, डॉ. उल्हास पाटील, वाय.जी.महाजन तर अलिकडच्या काळात हरीभाऊ जावळेंसह रक्षा खडसे यांचा निवडून आलेल्या उमेदवारात समावेश आहे. हा मतदार संघ लेवा पाटीदार समुदायाचा बालेकिल्ला मानला जातो तर या मतदारसंघात निर्णायक असणार्या मराठा समाजाला याठिकाणी अद्याप एकदाही यश मिळालेले नाही. रावेर लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ आहेत. त्यात रावेर-यावल, मुक्ताईनगर-बोदवड,भुसावळ,चोपडा, मलकापूर-नांदुरा, जामनेरचा समावेश आहे तर लोकसभा मतदार संघात लेवाविरुद्ध मराठा उमेदवार अशीच लढत कायम बघावयास मिळते. त्यामुळे रक्षा खडसे यांच्या उमेदवारीनंतर विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी-काँग्रेसकडून नेमकी कुणाला उमेदवारी जारी होते? याकडे लक्ष लागले आहे. माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांना कामाला लागण्याचे आदेश असलेतरी अद्याप पक्षाने त्यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली नाही.
विरोधकांसोबत शिवसेनेचे कडवे आव्हान
मतदारसंघात केलेली विकासकामे, तरुण खासदार, मतदारांशी असलेला थेट जनसंपर्क व गुर्जर समाजाची कन्या तसेच लेवा पाटील समाजाची सून असलेल्या रक्षा खडसे यांना गत निवडणुकीत बीजेचा लाटेचा मोठा फायदा झाला मात्र आता परीस्थिती बदलली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराशी सामना करावा लागत असतानाच भाजपा-शिवसेनेची युती झाली असलीतरी शिवसेनेने खडसे घराण्यात उमेदवारी दिल्यास प्रचार न करण्याचा दिलेला इशारा डोकेदुखी ठरू शकतो. गुरुवारीदेखील मुक्ताईनगर शिवसैनिकांनी रक्षा खडसे यांचा निवडणुकीत प्रचार न करण्याचा निर्धार करीत आंदोलन केले त्यामुळे शिवसेनेचा विरोध नेमका कुणाच्या पथ्थ्यावर पडणार? हे येणारा काळच ठरवणार आहे.
विविध मुद्दे ठरणार लक्षवेधी
गेल्या निवडणुकीत भाजपने अच्छे दिनचा नारा दिला होता. काँग्रेसमुक्त भारताच्या घोषणेत अच्छे दिनचे स्वप्न मतदारांना दाखवले. काळा पैसा परत आणणे, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकणे, स्वामीनाथन आयोग लागू करणे आदी विषय ऐरणीवर होते. पाच वर्षांत मतदारांना अच्छे दिन दिसले नाहीत मात्र आता निवडणुकीच्या तोंडावर शेतकर्यांना वार्षिक सहा हजार रुपये देणारी प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना, पुलवामा हल्ल्यानंतर झालेला सर्जीकल स्ट्राईक व ‘मोदी है तो मुमकिन है’ या नाक्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चौकीदार कॅम्पिनिंग या निवडणुकीत लक्षवेधी ठरणार आहे. गत निवडणूकीप्रमाणेच रोजगार, कृषी, सिंचन विकास, ग्रामविकास हा प्रमुख अजेंडा राहणार आहे.