खासदार रक्षा खडसेंच्या प्रचार वाहनाच्या धडकेने रेल्वे गेट तुटले

0

नाडगाव रेल्वे स्थानकाबाहेरील प्रकार ; दोन तास वाहतूक ठप्प

बोदवड- खासदार रक्षा खडसे यांच्या प्रचार वाहनाने नाडगाव रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे गेटला धडक दिल्याने गेट तुटल्याची घटना रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत प्रचाराचे वाहन थांबवले तर घटनेनंतर तब्बल दोन तास वाहतूक ठप्प झाल्याने वाहनधारकांचे चांगलेच हाल झाले.

रेल्वे गेट तुटल्याने प्रचंड खळबळ
नाडगाव रेल्वे गेट खासदार रक्षा खडसे यांचा प्रचार दौर्‍यातील गाड्यांचा ताफा मुक्ताईनगरकडे जात असताना प्रचार जाहिरात वाहन (क्रमांक एम.एच.01 एल.ए.2023) ची रेल्वे गेटला धडक बसली. अडीच वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने रेल्वे गेटचा दांडा तुटला. या घटनेने वाहतूक ठप्प झाली तर रेल्वे कर्मचार्‍यांनी प्रचाराचे वाहन बाजूला थांबवून ठेवले. या वाहनाचे चालक ईसाफ शेख (मुक्ताईनगर) यांनी झाल्या प्रकाराबद्दल दंड भरण्यास तयार असल्याची लेखी पत्र रेल्वे कर्मचार्‍यांना दिल्यानंतर रेल्वे कर्मचार्‍यांनी वाहन सोडले. दरम्यान, स्थानिक रेल्वे कर्मचार्‍यांशी संवाद साधला असता आमचे ज्युनिअर इंजिनिअर आल्यावर झालेल्या नुकसानीची पाहणी करतील व त्याचा खर्च अंदाज तयार करून संबंधित चालकाकडून तसा दंड वसूल करतील, असे ते म्हणाले. प्रचार वाहन वैयक्तिक जवाबदारीवर रेल्वे प्रशासनाला सोडता येते, असेही कर्मचार्‍यांनी सांगितले.