खासदार रक्षा खडसेंनी केली दीपनगरात अधिकार्‍यांशी चर्चा

0

भुसावळ। दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगारांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवार 22 रोजीपासून कामबंद आंदोलन केले आहे. या आंदोलनास आज तिसरा दिवस असून यासंदर्भात खासदार रक्षा खडसे यांनी बुधवार 24 रोजी दुपारी दीपनगर येथे भेट देऊन मुबंईहून आलेले मुख्य अभियंता अभय हरणे यांच्याशी चर्चा केली.

समस्या सोडविण्यासाठी अधिकार्‍यांना सुचना
यावेळी खासदार रक्षा खडसे यांनी अभय हरणे आणि दीपनगर केंद्राचे मुख्य अभियंता माधव कोठुके यांच्याशी चर्चा केली. व कामगारांच्या प्रतिनिधींकडून आपल्या मागण्या काय आहेत हे जाणून घेतले. यानंतर त्यांनी उर्जामंत्री बावनकुळे यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही. तरी कामगारांनी जे समान वेतन लागू करणे, कर्मचार्‍यांना निवासस्थाने देण्यात यावे या मागण्यांसंदर्भात मंत्र्यांशी चर्चा करुनच त्या सोडविण्यात येतील, तर इतर मागण्या या प्रशासकीय पातळीवरुन सोडविण्यासंदर्भात अधिकार्‍यांना सुचना केल्या. याप्रसंगी कामगारांच्या प्रतिनिधींना बैठकीदरम्यान बोलविण्यात येऊन त्यांना लागलीच बाहेर जाण्यास सांगितल्यामुळे कंत्राटी कामगारांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. मात्र अधिकार्‍यांसोबत चर्चा आटोपल्यानंतर पुन्हा कामगार प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलविण्यात आले होते.