खासदार श्रीरंग बारणेंकडून परराष्ट्र मंत्र्यांचे आभार

0

पिंपरी-चिंचवड : मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये चिंचवड व पनवेल याठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी दोन पासपोर्ट सेवा केंद्र मंजूर केल्याबद्दल खासदार श्रीरंग बारणे यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे आभार व्यक्त केले. खासदार बारणे यांनी दिल्लीत सुषमा स्वराज यांची भेट घेऊन त्यांना जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची गाथा देऊन ऋण व्यक्त केले. याप्रसंगी त्यांनी विविध विषयांवर चर्चादेखील केली.

नागरिकांकडून समाधान
नागरिकांना तत्काळ व कमी कालावधीमध्ये पासपोर्ट काढता यावा तसेच पासपोर्ट नुतनीकरण करता यावा, या दृष्टीकोनातून केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने नव्याने पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. या योजनेच्या अंतर्गत खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ मतदारसंघामध्ये चिंचवड व पनवेल या ठिकाणी पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याची मागणी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने परराष्ट्र मंत्रालयाने चिंचवड येथे दोन एप्रिल 2017 पासपोर्ट सेवा केंद्र चालू केले. या केंद्रामध्ये दररोज नव्याने जवळपास 225 नागरिकांना पासपोर्ट काढता येत असून, पासपोर्ट नुतनीकरणदेखील करता येत आहे. याचा लाभ नागरिकांना मिळत असून, अनेकांनी या योजनेबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

पनवेलमध्ये सेवा सुरू होणार
पनवेल येथे 17 जून 2017 रोजी नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यास परराष्ट्र मंत्रालयाने मान्यता दिली आहे. येत्या तीन महिन्यांमध्ये पनवेल शहरामध्ये पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होणार आहे. चिंचवड व पनवेल या ठिकाणी परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून पासपोर्ट सेवा केंद्रास मंजुरी दिल्याबद्दल खासदार श्रीरंग बारणे यांनी दिल्ली येथे परराष्ट्र मंत्रालयामध्ये जाऊन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली व आभार व्यक्त केले. यावेळी त्यांच्या सोबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते.