खासदार श्रीरंग बारणे यांचा प्रिमियर कंपनीच्या कामगारांच्या आंदोलनाला पाठींबा

0

पिंपरी -चिंचवड : पिंपरी येथील प्रिमियर कंपनीच्या कामगारांचे ६६ दिवसापासून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला खासदार श्रीरंग बारणे यांनी भेट देवून पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच कंपनीच्या कामगारांवर होत असलेल्या अन्याया विरोधात कामगारांच्या न्यायासाठी माझा सदैव पाठींबा राहिल, असेही ते म्हणाले.

…तर अनेक कारखाने शहरा बाहेर गेले
खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रिमियर लिमिटेड कंपनीच्या गेटवर झालेल्या जाहिर सभेत भेट दिली. यावेळी ते म्हणाले, पिंपरी चिंचवड मधील औद्योगिक नगरी उध्वस्त होत असून अनेक कारखाने पिंपरी चिंचवड शहरा बाहेर गेले आहेत. याला सर्वस्वी जबाबदार पिंपरी चिंचवड महानगरपालिका व राज्य शासन असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने औद्योगिक क्षेत्राचे निवासीकरण केल्याने (ITOR) अनेक कारखाने शहराबाहेर स्थलांतरीत झाले आहेत. आता या औद्योगिक नगरीच्या कारखानदारी वरती मोठमोठ्या टाऊन शिप उभ्या राहत आहेत.

राज्य सरकारने देखील याला सहमती दर्शविल्याने या औद्योगिक नगरीतील कामगार देशोधडीला लागला आहे. कामगारांच्या हाताला काम मिळत नाही. तरूणांमध्ये बेकारीचे प्रमाण वाढत आहे. प्रिमियर लिमिटेड कंपनी प्रशासना मागे राजकिय वरद हस्त कंपन्या असल्याने न्यायालयाने आदेश देवून देखील कामगारांना ८ महिने पगार मिळत नाही. कंपनीच्या कामगारांची पिळवणूक प्रिमियर कंपनीचे व्यवस्थापन करीत असून याचा जाहीर निषेध बारणे यांनी केला.

यांची होती उपस्थिती
यावेळी मानवी हक्क सुरक्षा समितीचे मानव कांबळे, शिवसेना शहर प्रमुख योगेश बाबर, कामगार नेते इरफान सय्यद, सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर, प्रिमियर एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष आशिष शिंदे, जनरल सेक्रेटरी नंदु जाधव व इतर पदाधिकारी तसेच श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष संतोष कणसे व सल्लागार दिलीप पवार उपस्थित होते.