पुणे । न्यू कापरे गावातील पुनर्वसनापासून वंचित कुटुंबीयांना हक्काची घऱे मिळाली पाहिजेत; तसेच विकसक खा. संजय काकडे व शासनाने 16 वर्षे उलटून गेली तरी हक्काची घरे दिलेली नाहीत त्याविरोधात युवक क्रांती दलाच्या वतीने सोमवारी नळस्टॉप चौैकात सत्याग्रही आंदोलन करण्यात आले. ‘संजय काकडे घर द्या’ अशा घोषणा देण्यात आल्या.
25 वेळा सत्याग्रही आंदोलनेे
न्यू कापरे गावतील पुनर्वसनापासून वंचित कुटुंबीयांना हक्काची घरे मिळावित यासाठी ‘युक्रांद’चे संस्थापक कुमार सप्तर्षी यांच्या मार्गदर्शनाखाली 17 एप्रिलपासून न्यू कापरे गावच्या पुनर्वसनाचे विकसक खा. संजय काकडे यांच्या कार्यलयाबाहेर 25 वेळा सत्याग्रही आंदोलनेे करण्यात आली. सत्याग्रहींना 25 वेळा अटक देखील झाली. पुनर्वसनाचा प्रश्न सुटला नाही. मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून अन्यायाविरोधात दाद मागितली. मुख्यमंत्र्यांनी याची जबाबदारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सोपविली. त्यामुळे काकडे यांच्या कार्यालयाबाहेरील आंदोलन थांबवून घटनात्मक मार्गाने हे आंदोलन शहरातील विविध चौकात करण्यात येत आहे. पुनर्वसनाच्या प्रक्रियेत गरीब व दलित कुटुंबीयांना जाणिवपूर्वक बाजूला ठेवण्यात आले असल्याचे युक्रांदच्या वतीने सांगण्यात आले. आंदोलनामध्ये कार्यवाहक संदीप बर्वे, संघटक जाबुवंत मनोहर, मयुरी शिंदे, अजय हापसे व प्रकल्पग्रस्त सहभागी झाले.