राजकोट । गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या घराबाहेर निदर्शने केल्याप्रकरणी राहुल गांधींचे निकटवर्तीय हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांना शनिवार मध्यरात्री गुजरात पोलिसांनी बेदम मारहाण केली. मारहाण केल्यानंतर सातव यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. नंतर जामिनावर सुटका केली.
काँग्रेस-भाजप नेत्यांमध्ये हाणामारी
राजकोट येथील रेया रोडवरील काँग्रेसचे उमेदवार इंद्रनील राजगुरु यांचे भाऊ दीप राजगुरु यांच्यावर भाजपचे पोस्टर काढण्याच्या वादातून हल्ला झाला होता. राजगुरु यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे भाजपचा हात असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. दरम्यान, मुख्यमंत्री विजय रुपाणींच्या घराबाहेरचे पोस्टर फाढण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते आले. यावेळी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांमध्ये हाणामारी झाली.
हिंगोलीत काँग्रेसचा राडा
हिंगोली । गुजरातमधील राजकोट येथील राड्याचे पडसाद रविवारी महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात उमटले. खासदार राजीव सातव यांना झालेल्या धक्काबुक्कीनंतर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी औंढा-नागनाथ येथे एक एसटी बसची तोडफोड केली. एसटी बसला काँग्रेस पार्टीचे झेंडे असून घटनास्थळावरून कार्यकर्ते पळून गेले. त्यानंतर भाजपच्या नगरपंचायत अध्यक्षा दिपाली पाटील यांचे कार्यालयही फोडण्यात आले. तसेच कार्यकर्त्यांकडून औंढा-हिंगोली या राज्य महामार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला.