पुणे । राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दिल्लीतील फेम इंडिया संस्थेकडून या पुरस्काराचे वितरण दिल्ली येथील विज्ञान भवनाच्या सभागृहात केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांच्या उपस्थितीत करण्यात आले. संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, कोळसा आणि खाण राज्यमंत्री हरिभाई चौधरी, माजी खासदार जनार्दन द्विवेदी, ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण डॉ. बिंदेश्वर पाठक यांच्यासह कार्तिकेय शर्मा, राजीव मिश्रा, फेमचे प्रमुख संदीप मारवाह आणि उमाशंकर सोंथालिया या कार्यक्रमाला उपस्थित होते.
हा सन्मान जनतेचा
माझा मतदारसंघ, राज्यातील जनतेचा विश्वास यांच्या बळावर संसदेत मला त्यांचे प्रश्न मांडता आले. हा सन्मान माझ्यापेक्षा माझ्यावर विश्वास ठेवणार्या जनतेचा आहे, अशी भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. मतदारसंघात केलेली कामे, अधिवेशन काळात उपस्थित केलेले प्रश्न आणि प्रश्न मांडतानाचा प्रभावीपणा या आणि अशा विविध मुद्दयांवर आधारित फेम इंडिया आणि आशिया पोस्ट या दोन संस्थांनी सर्वेक्षण केले होते. त्यातून देशभरातील 25 खासदारांची निवड करण्यात आली आहे.